श्रेणी निश्चित करण्यासाठी फॉलोअर्सची संख्या महत्त्वाची

| कोलंबो | वृत्तसंस्था |

लंका प्रीमियर लीगच्या (एलपीएल) सहाव्या हंगामापूर्वी श्रीलंका क्रिकेटने खेळाडू निवडीचे नियम जारी केले आहेत. ज्यामुळे क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे. आता खेळाडूंची श्रेणी निश्चित करण्यासाठी केवळ कामगिरी आणि अनुभवच नव्हे, तर सोशल मीडियावरील फॉलोअर्सची संख्यादेखील महत्त्वाची भूमिका बजावेल. या नियमाने क्रिकेट विश्वाला धक्का बसला असून सर्वत्र गदारोळ माजला आहे. ही लीग 10 जुलै 2026 रोजी सुरू होणार आहे.

लंका प्रीमियर लीगच्या नवीन नियमांनुसार, आयकॉन श्रेणीत समाविष्ट होण्यासाठी, एका परदेशी खेळाडूने किमान 75 टी आंतरराष्ट्रीय सामने, 100 पेक्षा जास्त फ्रँचायझी टी सामने आणि गेल्या 18 महिन्यांत किमान 30 सामने खेळलेले असणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त, खेळाडूच्या सोशल मीडिया खात्यांवर 2.5 लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स असणे आवश्यक आहे. स्टार श्रेणीसाठीही 2.5 लाख फॉलोअर्सची हीच अट लागू आहे. गोल्ड श्रेणीसाठी 30 टी आंतरराष्ट्रीय सामने, 75 फ्रँचायझी सामने, गेल्या 18 महिन्यांत 20 सामने आणि किमान 1.5 लाख फॉलोअर्स असणे आवश्यक आहे. क्लासिक श्रेणीतील खेळाडूंचाही मोठा चाहतावर्ग असणे आवश्यक आहे. नवीन नियमांमध्ये वेतन रचनेचा तपशीलही देण्यात आला आहे. आयकॉन आणि स्टार खेळाडूंना 60,000 ते 80,000 डॉलर्स, प्लॅटिनम खेळाडूंना 50,000 डॉलर्स, गोल्ड खेळाडूंना 30,000 डॉलर्स आणि क्लासिक खेळाडूंना 20,000 डॉलर्सपर्यंत वेतन मिळेल.

या निर्णयामुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अनेक क्रिकेट चाहत्यांच्या मते, हा नियम मैदानातील कामगिरीपेक्षा मार्केटिंग आणि लोकप्रियतेला अधिक महत्त्व देतो, जे खेळाडूंसाठी अन्यायकारक आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, श्रीलंका क्रिकेटने आयकॉन आणि स्टार श्रेणीतील खेळाडूंसाठी असलेली वादग्रस्त सोशल मीडिया फॉलोअर्सची अट काढून टाकली आहे. 9 मे रोजी प्रसिद्ध झालेल्या अद्ययावत प्लेअर रजिस्ट्रेशन अँड ड्राफ्ट गाईडमध्ये आता सोशल मीडिया फॉलोअर्सच्या किमान संख्येचा उल्लेख नाही. खेळाडूंना सोशल मीडियावरील उपक्रम, फॅन एंगेजमेंट कार्यक्रम आणि स्पर्धेच्या प्रसिद्धीमध्ये सहभागी होणे अजूनही आवश्यक असेल.

Exit mobile version