उपोषणाचे मिळाले फलित
। नेरळ । प्रतिनिधी ।
जेसीबी मशीनच्या साहाय्याने रस्ता खोदून गायब करणे चांगलेच महागात पडले असून त्याविरुद्ध उपोषणाला बसलेल्या आदिवासी ग्रामस्थांना आता आपला जुना रस्ता पुन्हा बनवून मिळणार आहे. प्रशासनाने आठ दिवसात रस्ता पूर्वी होता तसाच बनवून देण्याचे लेखी आश्वासन दिले असून बेडीसगावच्या आदिवासी ग्रामस्थांनी रात्री उशिरा उपोषण स्थगित केले. दरम्यान, आदिवासी उपोषणकर्ते यांची दुसरी मागणी असलेल्या रस्ता खोदणार्या लोकांवर गुन्हा दाखल होण्याबाबत जिल्हा परिषद बांधकाम विभाग पोलिसांना पत्र देईल आणि त्यानंतर पोलीस कार्यवाही करतील असे सांगण्यात आले आहे.
महिन्यापूर्वी कर्जत तालुक्यातील शेवटचे टोक असलेल्या बेडीसगाव येथील रस्ता वांगणी गावातील काही लोकांनी खोदून टाकला होता आणि त्यामुळे आदिवासी लोकांची ये-जा बंद झाली होती. 300 मीटर लांबीचा रस्ता गायब झाल्याने स्थानिक आदिवासी ग्रामस्थांनी नेरळ पोलीस ठाणे,कर्जत तहसिलदार यांच्याकडे न्यायासाठी धाव घेतली होती. त्यानंतर महिनाभरात प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचा न्याय मिळत नसल्याने स्थानिक आदिवासी ग्रामस्थांनी उपोषण करण्याचा निर्णय घेतला होता. 4 एप्रिल रोजी 10 जेष्ठ ग्रामस्थ आणि आदिवासी सेवा संघाचे तालुका अध्यक्ष जैतु पारधी, जिल्हा सचिव गणेश पारधी आणि मंगळ दरवडा या तीन पदाधिकारी यांनी कर्जत तहसील कार्यलयाबाहेर उपोषण सुरू केले होते.
शेवटी रात्री उशिरा तहसिलदार विक्रम देशमुख,जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपअभियंता खैराट, शाखा अभियंता गोपणे आणि महाराष्ट्र ग्रामीण विकास यंत्रणेचे शाखा अभियंता राहुल चौरे यांच्यामध्ये बैठक झाली. त्यात कर्जत पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की या देखील सहभागी झाल्या. शेवटी पक्क्या स्वरूपातील जुना होता तसाच आणि जुन्या जागेवर खोदलेल्या रस्त्याचा सर्व भाग तयार करून घेण्याचे ठरले. रस्ता खोदणारे वांगणी गावातील यांच्याकडून तो बनवून घ्यावा आणि त्यावर डांबरीकरण मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून करण्याचा निर्णय उपोषणकर्ते आणि तेथे जमलेले 200 हुन अधिक ग्रामस्थ यांनी मान्य केला. त्या रस्त्यात दोन ठिकाणी पाईप मोर्या देखील संबंधित व्यक्तीकडून खासगी काम करताना पूर्ण करून घेण्याचे लेखी आश्वासन तहसिल कार्यालयाचे वतीने देण्यात आले.