कर्जत शहर शिवसेना ठाकरे पक्षाची मागणी
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पोलीस मैदान शहरातील एकमेव खुले मैदान आहे. या मैदानाची मालकी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असून या मैदानाला संरक्षण भिंत घालण्यासासाठी दोन कोटींचा निधी मंजूर आहे. मात्र, खेळासाठी तसेच सार्वजनिक वापरासाठी असलेले हे एकमेव मैदान असून, या मैदानाला संरक्षण भिंत घातली जाऊ नये, अशी मागणी करणारे निवेदन कर्जत शहर शिवसेना ठाकरे पक्षाकडून निवेदन देऊन करण्यात आले.
कर्जत शहरातील ऐतिहासिक सभांचे साक्षीदार म्हणून कर्जत शहरातील पोलीस मैदान ओळखले जाते. या मैदानाची मालकी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असून, या मैदानावर पोलिसांची वसाहत तसेच कर्जत पोलीस ठाण्याची इमारत आणि जिल्हा पोलीस उपअधीक्षक यांचे कार्यालयाची इमारत वगळता अन्य कोणतीही वास्तू नाही. सार्वजनिक बांधकाम खात्याचे मालकीचे हे मैदान असलेतरी त्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम खात्याचे कोणतेही कार्यालय अथवा वास्तू नाही. या मैदानावर शहरातील विविध धार्मिक कार्यक्रम असतात, तर इतर वेळी हे मैदान वाहनाच्या पार्किंग साठी वापरले जाते. त्या पार्किंगसाठी कोणताही मोबदला पोलीस किंवा नगरपरिषद किंवा सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडून आकाराला जात नाही. त्यामुळे हे मैदान आओ जावो घर तुम्हारा अशा प्रकारे वापर होत आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हे मैदान दगडी कुंपण घालून बंदिस्त करण्याच्या हालचाली सुरु आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या भूमिकेला सर्व थरातून विरोध होत असून, बांधकाम विभागाने या कामासाठी काही निधीदेखील मंजूर केला आहे. त्यामुळे कर्जत शहरातील नागरिकांनी बांधकाम खात्याच्या या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. त्याबद्दल शिवसेना ठाकरे पक्षाने कर्जत सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देऊन विरोधाची भूमिका घेतली आहे. कर्जत शहर शाखेच्यावतीने बांधकाम खात्याचे उपअभियंता राहुल देवांग यांना निवेदन देऊन ही मागणी केली आहे. कर्जत शहर उपप्रमुख कृष्णा जाधव यांनी हे निवेदन दिले असून, त्यावेळी शिवसेना ठाकरे पक्षाचे कर्जत तालुका प्रमुख बाजीराव दळवी, कर्जत पंचायत समितीच्या उप सभापती चित्रा ठाकरे, माजी उपसभापती पंढरीनाथ राऊत, तसेच तालुका सहसंपर्क प्रमुख रामदास घरत जगदीश ठाकरे अजय कराळे आदी उपस्थित होते. शिवसेना ठाकरे पक्षाने त्या ठिकाणी मैदान बंदिस्त करण्याचा प्रयत्न झाल्यास आंदोलनाची भूमिका घेतली जाईल, असा इशारा दिला आहे.







