शालेय क्रीडा स्पर्धा भरवणारी एकमेव संस्था

सोमजाई माता क्रीडा मंडळाचे कौतुक

| म्हसळा | वार्ताहर |

रायगड जिल्ह्यासह म्हसळा तालुक्यात सामाजिक, क्रीडा क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या श्री सोमजाई माता क्रीडा मंडळ यांच्या वतीने तालुक्यातील शालेय क्रीडा स्पर्धाचे आयोजन करून चांगला आणि स्तुत्य उपक्रम राबविला आहे. शालेय क्रीडा स्पर्धा भरवणारी एकमेव संस्था असून, तिचा आदर्श इतर संस्था आणि मंडळांनी घेऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे, असे मत माजी सभापती तथा राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस महादेव पाटील यांनी बक्षीस वितरण समारंभात व्यक्त केले.

ते पुढे म्हणाले की, या मंडळाने गेली अनेक वर्षे राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धांचे आयोजन केले होते. मात्र, यावर्षी तालुक्यातील ग्रामीण भागातील युवा खेळाडू आणि विद्यार्थी यांच्यातील क्रीडागुणांना वाव मिळावा या हेतूने तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले, त्याबद्दल या मंडळाचे आभार मानतो. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन यांच्या वतीने दरवर्षी किशोर किशोरीगट, कुमार कुमारीगट अशा स्पर्धा आयोजित केल्या जातात. त्यामध्ये आपल्या तालुक्यातील खेळाडू यांनी सहभागी होण्यासाठी अशा प्रकारच्या स्पर्धा होणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना खेळाबद्दल आवड निर्माण होणे गरजेचे आहे, त्यातूनच त्याची प्रगती होऊन शरीर निरोगी आणि बळकट होईल आणि तालुक्यातून चांगले खेळाडू निर्माण होतील. असेही ते म्हणाले.

या स्पर्धेचे उदघाटन भाजप जिल्हा युवा अध्यक्ष निलेश थोरे, माजी सरपंच निलेश मांदाडकर, स्मरणिका प्रकाशन संस्थाप्रमुख चंद्रकांत खोत यांच्या हस्ते झाले. स्पर्धेत तालुक्यातील माध्यमिक, प्राथमिक शाळांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला होता. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष काशिनाथ पयेर, सेक्रेटरी काशिनाथ शितकर, नथुराम खोत, पांडुरंग माळी, नितीन मेंदडकर, नरेश कातळकर, महादेव मांदारे विस्तार अधिकारी जगदीश घोसाळकर, तालुक्यातील क्रीडा शिक्षक आदींसह मंडळाच्या सदस्यांनी सहकार्य केले. स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना चषक आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. संस्थेच्या वतीने दोन दिवस भोजनाचीही व्यवस्था करण्यात आली होती.

Exit mobile version