दळवींसह त्यांच्या समर्थकांची कानउघडणी

भरसभेत घेतला खासदार तटकरे यांनी पाहुणचार

। अलिबाग । प्रतिनिधी ।

नगरपरिषदेवर प्रशासक असल्याने मला विकास करता आला, असे आ. दळवी त्यांच्या भाषणात बोलून गेले. दरम्यान, तटकरे यांनी दळवींना टोला लगावत दुजाभाव दाखवू नका, अशी कानउघडणी केली. त्यामुळे जमलेल्या कार्यकर्त्यांचे हसून पोट दुखू लागले. सभेला उपस्थित प्रेक्षकांची त्यामुळे करमणूक झाल्याचे चित्र पहावयास मिळाले.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर महायुतीची सभा मुरूड येथे पार पडली. या सभेत खासदार तटकरे यांनी त्यांच्या शैलीत बोलत असताना दळवींसह त्यांच्या समर्थकांची चांगलीच कानउघडणी केली. व्यासपीठावरुन बोलताना लोकप्रतिनिधींनी तारतम्य बाळगून बोलावे, असेही तटकरे म्हणाले. आताची जनता सुज्ञ आहे, तुम्ही काय बोलता, कसे बोलता, तुम्ही भाषा कशी वापरता याकडे त्यांचे बारकाईने लक्ष असते. त्यामुळे भाषणातदरम्यान बोलताना दुसर्‍यांना वाईट वाटेल असे बोलू नका, अशी तंबीच थेट भरसभेत दळवींना दिली. तुमच्या बोलण्याने मतदार तुमची किंमत करतात, याची दखल घ्या, असेही ऐकवले. त्यावर दळवींनी तटकरेंसमोर दोन्ही हात जोडले. तसेच तुम्ही सांगाल तसे वागण्याचा प्रयत्न करतो, असे म्हणाले.

तटकरे एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी दळवींच्या कार्यकर्त्यांचीही चांगलीच हजेरी घेतली. सभेत उपस्थित शिवसेना शिंदे गटाच्या उपप्रमुखावर तोंडसुख घेतले. काही वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये, त्यानंतर भाजपमध्ये, आता शिवसेनेत, अशा उड्या मारीत शिंदे गटात आल्याचे सांगताच सभेदरम्यान एकच हशा पिकला.

आपले कान शाबूत ठेवा, हलक्या कानाचे राहू नका, असा सल्ला दळवींना देताना, आपले कान सोन्याचे असावेत ते पितळेचे ठेवून कान भरणार्‍यांचे ऐकू नका असेही ते म्हणाले. तटकरेंनी भाषणादरम्यान त्यांच्या शैलीत दळवी व त्यांच्या समर्थकांची उडवलेखी खिल्ली उपस्थित प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचे साधन बनले.

Exit mobile version