तामशी बंदर येथील उघाडीचे काम युद्धपातळीवर

| पेण | प्रतिनिधी |

नारवेल-बेनवले खारबंदिस्ती अंतर्गत सात उघाडी व एक वासखांड अशा एकूण आठ उघाडींचे काम सुरू असून, ते अखेरच्या टप्प्यात आले आहे. त्यातील तामशी बंदर येथील उघाडी क्र. 6 येथील काम सुरू असताना दोन दिवसांपूर्वी बाजूची माती घसरून बांध समुद्राच्या बाजूनी खचला आणि त्यामुळे उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. आमच्या प्रतिनिधीकडे अशाप्रकारची तक्रार ग्रामस्थांनी केली.

दरम्यान, घटनास्थळी जाऊन नक्की काय प्रकार झाला आहे, याबाबत माहिती घेतली. त्यावेळी खारभूमीचे अभियंता दादासाहेब सोनटक्के यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, उघाडीच्या खालच्या बाजूनी संरक्षण भिंतीचे काँक्रिटीकरण सुरू आहे. त्यातच त्या बाजूने असलेली माती चिखलयुक्त नरम असल्याने खालच्या बाजूला होत असलेल्या काँक्रिटीकरणामुळे ती घसरली आहे. मात्र, ती माती घसरण्याचा आणि कामाच्या गुणवत्तेच्याबाबत काहीही संबंध नसल्याचे सांगितले. ते म्हणाले की, ज्यावेळी या उघाडीचे काम पूर्ण होईल, त्या वेळेला माती सरकण्याचा संबंधच राहणार नाही. परंतु, आता सध्या काम सुरू असल्यामुळे असे होत आहे. येत्या महिन्याभरात या उघाडीचे काम पूर्ण होईल.

सध्या तामशी बंदर येथील उघाडीचे काम काँक्रिटीकरण, संरक्षण भिंतीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. येत्या महिन्याभरात हे काम पूर्ण होऊन त्याचा फायदा तामशी बंदर येथील नागरिकांना होणार आहे.

… तर खारेपाट सुजलाम् सुफलाम् होईल
प्रत्येक उघाडीच्या कामासाठी एक कोटींची तरतूद असून, त्याची डिझाईन ज्याप्रमाणे आहे, त्याप्रमाणे काम केल्यास भविष्यात कधीही या खारभूमी बंदिस्तीला धोका पोहचणार नाही, असे प्रथमदर्शनी चित्र दिसत आहे. असे असले तरी, खारबंदिस्तीचे 17 किलोमीटरचे पूर्ण काम होण्यासाठी साधारणतः 100 कोटींची गरज आहे. या निधीची उपलब्धता झाल्यास भविष्यात खारेपाट सुजलाम् सुफलाम् झाल्याशिवाय राहणार नाही.

Exit mobile version