| अलिबाग | प्रतिनिधी |
चौलच्या विकासाबाबत विरोधकांनी बोलण्याचे धाडसही करू नये, असे स्पष्ट आणि परखड मत चौल ग्रामपंचायतचे उपसरपंच अजित गुरव यांनी व्यक्त केले आहे. रायगड जिल्हा परिषदेचे विरोधी पक्ष नेते सुरेंद्र म्हात्रे यांच्या पुढाकारातून जिल्हा परिषद सेस फंडाच्या माध्यमातून चौलमध्ये ऐतिहासिक आणि सर्वसमावेशक विकासकामे झाली असून, त्याचे ठोस पुरावे आज संपूर्ण गावासमोर उभे आहेत, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
चौल गायचोळे अंतर्गत रस्ता, चौल कुंडेश्वर रस्ता, चौल भगवती अंतर्गत रस्ता, चौल बीबी रस्ता, अष्टविनायक रस्ता, सराई रस्ता, चौल तुलाडदेवी टेंबी गल्ली, चौल ठाकूर आळी रस्ता, सागमाळ रस्ता, पीरांचे देऊळ ते घरत आळी रस्ता, तसेच गटारांचे काँक्रीटीकरण, बुआ दफनभूमी संरक्षण भिंत आदी असंख्य विकासकामे काही प्रमाणात स्वखर्चातून, तर काही शासकीय निधीतून पूर्णत्वास नेण्यात आली आहेत. ही सर्व कामे म्हणजे सुरेंद्र म्हात्रे यांच्या कार्यक्षम नेतृत्वाची ठळक साक्ष असल्याचे गुरव यांनी नमूद केले.
कोविड महामारीच्या अत्यंत कठीण काळात गरजू नागरिकांना धान्य वाटप, गावातील असून मुंबईत अडकलेल्या रहिवाशांसाठी राबवलेला ”या चिमण्यांनो परत फिरा रे” हा माणुसकीचा उपक्रम, तसेच निसर्ग चक्रीवादळात नुकसानग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून शासनाकडून मदत मिळेपर्यंत केलेला सातत्यपूर्ण पाठपुरावा ही सारी कामे जिल्हापरिषदेचे विरोधी पक्ष नेते असतानाही सुरेंद्र म्हात्रे यांनी केली आहेत. ”फक्त आरोप नव्हे, तर जमिनीवर उतरलेला विकासच आमची ओळख आहे. त्यामुळे ज्यांनी काहीच केलं नाही, त्यांनी चौलच्या विकासावर बोलण्याआधी आत्मपरीक्षण करावे,” असा घणाघाती टोला अजित गुरव यांनी यावेळी विरोधकांना लगावला.









