पनवेल रेल्वे स्टेशन परिसराचा श्वास कोंडतोय

परिसरात घाणीचे साम्राज्य

| नवीन पनवेल | प्रतिनिधी |

जंक्शन होत असलेल्या पनवेल रेल्वे स्टेशन परिसरात सध्या बेकायदेशीर झोपड्या तसेच घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे या ठिकाणाहून ये-जा करणाऱ्या प्रवासी, नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

पनवेल रेल्वे स्थानक परिसरातून तक्काकडे जाणाऱ्या रस्त्यावरील फुटपाथवर अनेक बेकायदेशीर झोपड्या उभारण्यात आले आहेत. त्यामुळे रेल्वे स्टेशन परिसराचा श्वास कोंडला आहे. फुटपाथवरच अनोळखी नागरिकांनी आपल्या मुलाबाळांसह संसार थाटल्याने पादचाऱ्यांना त्याचा त्रास होत आहे. मात्र, पनवेल महानगरपालिकेचे याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.

पनवेल रेल्वे स्टेशन परिसरात अनेक मोठमोठ्या इमारती उभ्या राहात आहेत. याच रेल्वे स्टेशन परिसरातून अनेक नागरिक कामानिमित्त हजारोंच्या संख्येने ये-जा करत असतात. पनवेल हे जंक्शन रेल्वे स्टेशन होत आहे, मात्र या स्टेशनच्या आजूबाजूच्या परिसरात बेकायदेशीर झोपड्या उभ्या राहात आहेत. त्यामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्या ठिकाणी झोपड्यांमध्ये राहणारे नागरिक कुठून आले आणि कोण आहेत याचादेखील थांगपत्ता नाही. त्यामुळे गुन्हेगारीच्या घटना वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पनवेल महानगरपालिका आणि पनवेल शहर पोलिसांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. पनवेल शहराचा झपाट्याने विकास होत असताना रेल्वे स्टेशन परिसरात बकालीकरण सुरू असताना प्रशासन गप्प का, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. फूटपाथवर उभारण्यात आलेल्या बेकायदेशीर झोपडपट्टीतील मुले याच ठिकाणी असलेल्या रेल्वे स्टेशनजवळील सर्कलजवळ उभे असतात. त्यामुळे येण्या-जाणाऱ्या प्रवाशांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. अनेकदा प्रवाशांची वाटदेखील अडवल्याच्या घटना ताज्या आहेत.

Exit mobile version