संतोष भोईर यांचे आवाहन
। नेरळ । प्रतिनिधी ।
शिवसेनेला जिवंत ठेवण्यासाठी त्या सर्वांनी बंड केले असून ते बंड नसून क्रांती आहे, असे मत शिवसेनेने विधानसभा मतदारसंघ संघटक संतोष भोईर यांनी मांडले. दरम्यान, आम्ही आजही शिवसेनेत आहोत आणि राहणार, असेही त्यांनी जाहीर केले. कर्जत विधानसभा मतदारसंघाचे आ. महेंद्र थोरवे समर्थकांचा मेळावा शिरसे येथील राधाई मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी कर्जत तालुका संघटक शिवराम बदे, कर्जत पंचायत समितीचे माजी सभापती राहुल विशे, माजी उपसभापती मनोहर थोरवे, खालापूर नगरपंचायतच्या नगराध्यक्ष जोत्सना मोडवे, नेरळ ग्रामपंचायतच्या सरपंच उषा पारधी, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या पूजा थोरवे, मनोहर पादीर, रमेश मते, खालापूरचे गटनेते किशोर पवार, खोपोली शहर संघटिका प्रिया जाधव, सुरेखा खेडेकर, खोपोली उपशहर प्रमुख संदीप पाटील, प्रवक्ते तात्या रिठे तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

यापुढे मार्गदर्शन करताना संतोष भोईर यांनी संघटनेवर ही वेळ का आली? असा प्रश्न उपस्थित करीत हे सर्व अन्य पक्ष संघटनांचा हस्तक्षेप वाढतो, त्यावेळी पक्षात बंड उभे राहते. राज्याचे सक्षम मुख्यमंत्री म्हणून उध्दव ठाकरे यांनी चांगले काम केले. राज्यावर आलेली संकटे परतवून लावली. अशा मुख्यमंत्र्यांनी आपले घर जळत आहे, याकडे लक्ष द्यायला हवे होते. मात्र अशा परिस्थितीतही सर्व आमदार आपण शिवसेनेत आहोत आणि शिवसेनेत राहणार हे सांगत आहेत. त्यामुळे त्यांना आमचा पाठिंबा असून आमदार थोरवे यांच्या पाठीशी आम्ही उभे आहोत.
आमची पक्षप्रमुख यांना एकच विनंती असून आजच्या पक्षांतर्गत बंडाने नवीन पोकळी निर्माण झाली आहे आणि ती पोकळी दूर करण्याचे काम नेतृत्वाने करावे, असे आवाहन देखील भोईर यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांनी आपले मतदारसंघ बांधणीसाठी सर्व निधी तिकडे वळवला आहे आणि त्यांतून पक्षाचे कार्यकर्ते खचून जात आहेत. या मानहानीपासून बंड उभे राहिले. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे या सर्वांना माफ करतील आणि राज्यात शिवसेनेचे राज्य कायम राहिले पाहिजे, असा आशावाद संतोष भोईर यांनी व्यक्त केला.
पक्षाचे 55 पैकी एवढे आमदार का बंड करतात?याचा विचार पक्ष नेतृत्वाने करायला हवा होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासमोर आपण लढत आहोत आणि त्यांच्याशी जुळवून घेणे कठीण होते. त्यामुळे आपल्या आमदारांनी त्याला कायम विरोध केला. त्यांचे बंड स्वतःसाठी नसून शिवसैनिकांना जगविण्यासाठी आहे. आपल्या आमदारांना मोठ्या प्रमाणत पाठिंबा दिला, याबद्दल सर्वांचे आभार.
– पंकज पाटील, शिवसैनिक
थोरवेंमुळे नवी उर्जा मिळाली
कार्यकर्त्यांच्या प्रत्येक चांगल्या-वाईट प्रसंगाला साथ देणारा नेता आमदार महेंद्र थोरवे यांच्या रूपाने मिळाला आहे. खोपोली येथील डॉ. हेमंत पाटील यांनी आपली भूमिका मांडताना हा जनसमुदाय आमदार महेंद्र थोरवे यांची ताकद दाखवत आहे असे स्पष्ट केले. मला बाळासाहेबांची शिवसेना आवडायची. उध्दव ठाकरे यांची शिवसेना आवडायची नाही. पण आता आमदार थोरवे यांच्या रुपात आम्हाला पुन्हा ऊर्जा मिळाली असून आम्ही थोरवे यांच्यासोबत आहेात.