महायुतीचा मंडप रिकामा; तटकरेंविरोधात तटबंदी

मतदार, पदाधिकार्‍यांमध्ये नाराजीचे काटे

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

लोकसभा निवडणुकीचा प्रचार कळस गाठत असतानांच, रायगड लोकसभा मतदारसंघात अजित पवार गटाचे नेतृत्व करणारे सुनील तटकरे कमी होत असलेल्या गर्दीच्या आव्हानात्मक परिस्थितीशी झुंजत आहेत. तटकरेंच्या सभांना तुरळक उपस्थिती असल्याने तटकरेंचं मनोधैर्यही खचत असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. एकेकाळी रायगडमध्ये दबदबा निर्माण करणार्‍या तटकरेंना मतदारांना आकर्षित करण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. सत्तेत राहण्यासाठी सुनील तटकरे यांनी वेळोवेळी केलेल्या गलिच्छ राजकारणामुळे त्यांच्याबद्दलची विश्‍वासार्हता कमी झाल्याचे या निवडणुकीतून दिसत आहे. सभेत तटकरे काय बोलणार, यापेक्षा मंडपातील रिकाम्या खुर्च्या लक्ष वेधून घेत असल्याचे चित्र गेल्या अनेक सभांमध्ये पहायला मिळाले.



लोकसभा निवडणुकीचे रायगड मतदारसंघाचे उमेदवार जाहीर झाले असून इंडिया आघाडीचे अनंत गीते तर महायुतीचे सुनील तटकरे रिंगणात उतरले आहेत. शेकाप, काँग्रेस, शिवसेना यांच्या भक्कम पाठिंब्यामुळे अनंत गीते यांचे पारडे जड असून सुनील तटकरेंविरोधात मराठा, ओबीसी, दलित आणि मुस्लिम समाज एकवटला आहे. अनंत गीते यांच्या तुलनेत तटकरे यांनी कायमच जनतेची फसवणूक केल्याने जनतेला स्वच्छ प्रतिमेचा नेता हवा असल्याचे विविध समाज संघटनांनी जाहिरपणे सांगितले आहे. परिणामी अनंत गीतेंनाच निवडून आणण्यासाठी विविध संघटनांनी चंग बांधला आहे. याशिवाय अलिकडील महायुतीच्या सभा पाहता महायुतीतील अंतर्गत वादामुळे शिंदे, भाजपचे आमदार, पदाधिकारी तटकरेंना कितपत सहकार्य करतील, याबाबतही साशंकता व्यक्त करण्यात येत आहे. महायुतीच्या सभांकडे मतदारांनी पाठ फिरवली आहे. अनंत गीते यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. याशिवाय त्यांच्या सभांना मतदारही आवर्जून उपस्थित राहत आहे. याउलट महायुतीचा मंडप मात्र रिकामाच असल्याचे अनेक संभांमधून समोर आले आहे.

शिंदेसेनासहकार्य करणार?
शिवसेना फुटल्यानंतर भरत गोगावले यांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली होती. मात्र, तेव्हापासून आजतागायत मंत्रीपदाच्या प्रतीक्षेत असलेल्या भरत गोगावलेंची मनोकामना पूर्ण झाली नाही. त्यांनी रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी सातत्याने दावा केला होता. मात्र ते सुद्धा त्यांच्या वाट्याला आलं नाही. त्यामुळे महायुतीची ताकद रायगड लोकसभा मतदारसंघात दिसत असली, तरी मनाने ते एकत्र आहेत का? हा मोठा प्रश्‍न आहे.  
मनोमिलन कधी होणार? 
रायगड लोकसभा मतदारसंघांमध्ये भरत गोगावले, अलिबागचे महेंद्र दळवी आणि दापोलीची योगेश कदम हे सातत्याने रायगडच्या तत्कालीन पालकमंत्री आदित्य तटकरे आणि सुनील तटकरे यांच्या विरोधात भूमिका घेत होते. इतकेच नव्हे तर सातत्याने आरोप प्रत्यारोप सुद्धा झाले होते. याशिवाय भाजपचे धैयशील पाटील यांनी सुनील तटकरे नको म्हणून भाजपमध्ये प्रवेश केला असल्याचे बोलले जाते. मात्र अजित पवार गटाच्या सुनील तटकरेंना महायुतीतून तिकिट मिळाल्याने धैर्यशील पाटील यांचा भ्रमनिरास झाला. त्यामुळे तटकरेंविरोधात काम करु पाहणारे धैर्यशील पाटील तटकरेंना कितपत सहकार्य करतील हा देखील प्रश्‍नच आहे. 
Exit mobile version