नेरळ रेल्वे स्थानकातील पादचारी पूल तोडण्यास सुरुवात

। नेरळ । प्रतिनिधी ।
नेरळ रेल्वे स्थानकात 2003 मध्ये बांधण्यास सुरुवात केलेला पादचारी पूल अर्धवट अवस्थेत होता. त्या अर्धवट अवस्थेत असलेल्या पादचारी पूलचे दोन्ही बाजूला असलेले खांब हटविण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, नेरळ रेल्वे स्थानकात आणखी दोन नवीन पूल केले जाणार असल्याने अर्धवट अवस्थेत असलेल्या पादचारी पुलाचे पिलर आता जमीनदोस्त करण्यात येत आहेत. 2003 मध्ये पादचारी पुलाचे काम सुरू झाले आणि दोन्ही बाजूला सिमेंटचे खांब उभे राहिल्यानंतर त्यावेळी 80 लाख रुपये खर्च अंदाजपत्रक असलेल्या त्या पुलाचे काम बंद पडले ते अनेक वर्षे बंद राहिले होते. 2000 साली या भागाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी नेरळ रेल्वे स्थानकाचा मेकओव्हर करण्याचा कालबद्ध कार्यक्रम रेल्वे कडून मंजूर करून घेतला आणि नेरळ स्थानकात नवीन पादचारी पूल साकारला असताना आणखी दोन पादचारी पूल नेरळ या जंक्शन रेल्वे स्थानकात उभे राहणार आहेत.

त्यामुळे नेरळ रेल्वे स्थानकातील अर्धवट स्थितीत असलेला पादचारी पूल जमीनदोस्त केला जात आहे. मुंबईकडे असलेला अर्धवट स्थितीतील पादचारी पुलाचे पिलर काढून टाकण्याचे काम मध्य रेल्वेने हाती घेतले आहे. स्थानकातील फलाटावर असलेला पादचारी पूल बाजूला करताना प्रवाशांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी कापड बांधण्यात आले आहे. तर नव्याने मंजूर असलेल्या पादचारी पुलाचे आणि एक्ससिलेटरचे काम सुरू करावे अशी मागणी प्रवासी संघटनेचे अध्यक्ष संदीप म्हसकर यांनी केली आहे.

Exit mobile version