| नेरळ | प्रतिनिधी |
मध्य रेल्वेच्या नेरळ स्थानकाचा मेकओव्हर करण्याचा निर्धार खा.श्रीरंग बारणे यांनी केला आहे. स्थानकात आता तिसर्या पादचारी पुलाच्या कामाला मुंबई रेल कॉर्पोरेशन कडून सुरुवात झाली आहे. नेरळ रेल्वे स्थानकात पादचारी पूल आणि स्काय वॉक अशी दुहेरी भेट नवीन वर्षात प्रवाशांना मिळाली आहे. स्थानकाच्या मध्य भागात पादचारी पूल आणि लिफ्टची व्यवस्था पूर्ण झाली असून लिफ्ट तीन महिन्यापूर्वी कार्यान्वित झाली आहे. तर मुंबई एन्ड कडील पादचारी पुलाचे काम मुंबई रेल कार्पोरेशन कंपनीकडून सुरु करण्यात आले आहे.
त्यासाठी तेथे असलेल्या जुन्या पादचारी पुलाचे खांब तोडून टाकण्यात आले आणि त्याच ठिकाणी नवीन पूल बांधण्यात येत आहे. नेरळ स्थानकात कर्जत एन्ड कडे हा नवीन पादचारी पूल बांधला जाणारा असून त्यात फलाट एक वरून फलाट दोन असा पादचारी पूल असणार आहे. त्यानंतर हा पादचारी पूल स्कायवॉक मध्ये रूपांतरित होणार असून त्या पादचारी पुलाचा एक भाग मिनीट्रेनच्या लोको मधून नेरळ गावातील बाजारपेठेत असलेल्या मध्य रेल्वेच्या पार्किंग मध्ये उतरणार आहे.
त्यामुळे उपनगरीय लोकल मधून नेरळ स्थानकात उतरलेले प्रवासी थेट नेरळ बाजारपेठ भागातील पार्किंग मध्ये पोहचणार आहे. त्याचा फायदा प्रवाशांना होणार असून स्थानकाच्या बाहेर असलेली गर्दी यांचा फटका प्रवाशांना बसणार नाही आणि प्रवाशी अधिक लवकर स्थानकातून बाहेर पडणार आहेत. त्या पादचारी पुलाचे काम नेरळ स्थानकात सुरु झाले असून त्या पुलाचा दुसरा टप्पा ज्या मिनीट्रेनच्या लोको कार्यशाळेत आहेत तेथे देखील बांधकामाला सुरुवात झाली आहे.