नाट्यगृहाचे रखडलेले कामे पूर्ण करणार

| कर्जत | प्रतिनिधी |

कर्जत नगरपरिषदेकडून राबवण्यात आलेल्या आमराई परिसरातील खुले नाट्यगृह मागील अनेक वर्षे दुरुस्तीच्या कामासाठी बंद आहे. मात्र, या प्रकल्पाचे काम अनेक वर्षानंतर देखील अपूर्णच राहिले आहे. त्यामुळे या प्रकल्पाला चालना देण्यासाठी नगरपरिषद कडून प्रकल्पाची पाहणी करण्यात आली.

शहरातील उल्हास नदीलगत आमराई परिसरात खुले नाट्यगृह आहे. तत्कालीन आमदार सुरेश लाड यांच्या माध्यमातून नाट्यगृहाची निर्मिती झाली होती. त्या नाट्यगृहाच्या जागी नव्याने क्रीडा नगरी उभारण्याचे काम कर्जत नगरपरिषदेकडून सुरू करण्यात आले आहे. आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून खुले नाट्यगृहाचे सुशोभिकरण आणि जोडीला क्रीडा नगरी उभारण्याचे काम मंजूर झाले. मात्र, त्या निधीमधून प्रेक्षक गॅलरी उभी राहिली आहे. या ठिकाणी असलेल्या नाट्यगृहाचे काम रखडले असून, त्या कामाला 12 वर्षानंतर चालना देण्यासाठी विद्यमान सदस्य मंडळाने प्रयत्न सुरू केले आहेत. अनेक वर्षे रखडलेल्या आमराई नाट्यगृह-क्रीडानगरीची पाहणी कर्जत नगरपरिषद कडून करण्यात आली. आमराई क्रीडानगरी आणि नाट्यगृह या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला चालना देण्यासाठी नगरपरिषदेने पाहणी केली. यावेळी नगराध्यक्ष पुष्पा दगडे, मुख्याधिकारी तानाजी चव्हाण आणि गटनेते नगरसेवक महेंद्र चंदन, अशोक राऊत, कुमेश मोरे, नेहा शिंदे, सुमिता गायकवाड अनेक नगरसेवक उपस्थित होते. या प्रकल्पाची पाहणी सुरू असताना सत्ताधारी कर्जत परिवर्तन आघाडीचे नेते सुधाकर घारे यांनी भेट दिली. यावेळी जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती नारायण डामसे, राष्ट्रवादी तालुकाप्रमुख दीपक श्रीखंडे, माजी नगराध्यक्ष राजेश लाड, पंकज पाटील, सोमनाथ पालकर, अतुल कडू आदी उपस्थित होते.

Exit mobile version