राजकीय तालुकाध्यक्षांना दाखवला घरचा रस्ता
| पेण | प्रतिनिधी |
पेण तालुक्यातील वडखळ, बोरी, वाशी, दिव, तरणखोप, बळवली, दुष्मी या सातही ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये प्रस्थापितांना जनतेने अक्षरशः नाकारले. महत्त्वाची बाब म्हणजे, बोरी ग्रामपंचायत अविनाश म्हात्रे मा. तालुका अध्यक्ष शिवसेना, वाशी ग्रामपंचायत तालुकाध्यक्ष श्रीकांत पाटील भाजप, तरणखोप ग्रामपंचायत जगदीश ठाकूर तालुकाध्यक्ष शिवसेना, दुष्मी ग्रामपंचायत दयानंद भगत राष्ट्रवादी काँग्रेस या तालुकाध्यक्षांना जनतेने घरचा रस्ता दाखविला आहे. भाजप तालुकाध्यक्षांचे वर्चस्व असणाऱ्या वाशी ग्रामपंचायतीमध्ये इंडिया आघाडीच्या संदेश ठाकूर यांनी भाजपचे उमेदवार अशोक म्हात्रे यांचा पराभव केला असून, श्रीकांत पाटील यांच्या एकाधिकार सत्तेला जोरदार धक्का पोहोचवला आहे.

बोरी ग्रामपंचायतीमध्ये अविनाश म्हात्रे यांनी गेली 20 वर्षे सत्ता राबविली. परंतु, या वेळेला अविनाश म्हात्रे यांच्या पॅनला जोरदार धक्का देत नंदिनी रवींद्र म्हात्रे यांनी 420 मतांनी अश्विनी म्हात्रे यांचा पराभव केला. दिव ग्रामपंचायतीमध्येदेखील मा. सरपंच विवेक म्हात्रे यांच्या पत्नी भाग्यश्री म्हात्रे यांचा मनिषा मंगलदास ठाकूर यांनी 476 मतांनी पराभव केला. महत्त्वाची बाब म्हणजे, या ग्रामपंचायतीमध्ये आमदार रविशेठ पाटील विरुध्द माजी आ. धैर्यशील पाटील अशी लढाई होती. यामध्ये आ. पाटील यांनी बाजी मारली. तरणखोप ग्रामपंचायतीमध्ये शिवसेना उबाठा गट आणि डी.बी. पाटील भाजप गट याविरुद्ध दिनेश पाटील भाजप गट अशी लढाई होती. यामध्ये दिनेश पाटील भाजप गटाच्या दर्शना दिनेश पाटील या 152 मताने डी.बी. पाटील भाजप गटाच्या निकीता पाटील यांचा पराभव केला. बळवली ग्रामपंचायतीमध्ये उबाठा गटाच्या उज्वला पाटील यांनी भाजपच्या सुकन्या पाटील यांचा पराभव करुन संजय डंगर यांच्या वर्चस्वाला धक्का पोहोचवला आहे. तर, दुष्मी ग्रामपंचायतीमध्ये तालुकाध्यक्ष दयानंद भगत यांच्या पत्नी रश्मी भगत यांचा दारुण पराभव नेत्रा महेंद्र घरत यांनी केला. पेण तालुक्यातील सर्वात जास्त खासदार, मंत्री आणि आमदारांचा दौरा असणारी ग्रामपंचायत म्हणजे दुष्मी ग्रामपंचायत. या ग्रामपंचायतीच्या छोट्या-मोठ्या कार्यक्रमालादेखील मंत्री आदिती तटकरे, खा. सुनील तटकरे, आ. अनिकेत तटकरे हजेरी लावायचे. त्यामुळे हा पराभव फक्त दयानंद भगत यांचा नसून, त्यांचे लाड पुरवणाऱ्या नेते मंडळींचा आहे, असे राजकीय विश्लेषक बोलत आहेत. नेत्रा महेंद्र घरत या उबाठा गटाच्या उमेदवार होत्या. 2018 च्या निवडणुकीमध्ये नेत्रा घरत यांना 45 मतांनी पराभवाला सामोरे जावे लागले होते. परंतु, यावेळेला त्यांनी त्याचा वचपा काढत 781 मतांनी रश्मी भगत यांचा पराभव केला आहे.
पेण शहरात सर्वात चर्चेची ग्रामपंचायत होती ती म्हणजे वडखळ. या ग्रामपंचायतीमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी पहायला मिळाल्या. परंतु, निलेश म्हात्रे आणि योगेश पाटील या मुत्सद्दी व धुरंदर व्यक्तींनी राजेश मोकल यांच्या सत्तेला सुरुंग लावला. राजेश मोकल यांच्या पत्नी पूजा मोकल यांचा 1,242 मतांनी नवख्या शिवानी विश्वास म्हात्रे यांनी पराभव केला. तर, राजेश मोकल हे स्वतः प्रभाग क्रमांक 5 मधून निवडणूक लढवत होते. या प्रभागातदेखील त्यांचा 342 मतांनी महेंद्र पाटील यांनी पराभव केला. एकंदरीत, वडखळ येथील राजेश मोकल यांची राजकीय सत्ता संपुष्टात आणली. बेलवडे येथे एकतर्फी लढत पहायला मिळाली. हरेश परशुराम पाटील यांनी 900 मतांनी प्रतिस्पर्धी अनिरुद्ध चौरे यांचे डिपॉझिट जप्त करुन पराभव केला. तर, महलमिरा येथे सोनल बाळू उघडे यांनी इतर सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त करत त्यांचा पराभव केला. एकंदरीत, पेणच्या निवडणुकीमध्ये प्रस्थापितांना जनतेने नाकरले असून, राजकीय बड्या पुढाऱ्यांनादेखील घरचा रस्ता दाखविला आहे.