जनताच भाजपची सत्ता बरखास्त करणार; शरद पवार यांचा इशारा

। मुंबई । दिलीप जाधव ।
देशातील अनेक राज्य बरखास्त करण्याचा प्रयत्न होतोय त्यामुळे आज ना उद्या भाजपची  सत्ता जनता बरखास्त केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपला इशारा दिला आहे .

राष्ट्रवादी काँग्रेसची राज्य कार्यकारिणीची बैठक मंगळवारी  (दि.12)  यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे पार पडली. यावेळी शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना अडीच वर्ष लोकांच्या अडीअडचणीला धावून जाण्याचे आवाहन केले.

ते पुढे म्हणाले की संसदीय लोकशाहीवर हल्ला करण्याचे काम सध्या भाजप करत आहे. मध्यप्रदेश असो वा महाराष्ट्र,काय झालं ते  तुम्हाला माहीत आहे. लोकशाही मार्गाने आलेल्या लोकांना बाजुला करुन सत्ता आपल्या हातात कशी राहील, असा प्रयत्न होत आहे. हा सत्तेचा दोष आहे. सत्ता केंद्रीत झाली तर ती एका हातात जाते. ती सत्ता विकेंद्रित झाली पाहिजे तर ती अनेक लोकांच्या हातात जाते. मात्र हल्ली केंद्रातील सरकार केंद्रीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ईडी, सीबीआय या गोष्टी आपल्याला अगोदर कधी माहीत नव्हत्या. त्या अलीकडे आल्या आहेत. ईडीचा काँग्रेसकडून कधी वापर झाला नाही. मात्र आता सत्तेचा वापर करून राजकीय दहशत निर्माण केली जात आहे. त्यामुळे सर्वांसाठी आज हा संघर्षाचा काळ आहे, असेही शरद पवार यांनी सांगितले .

जनतेला सत्ता परिवर्तन मान्य नाही
आज ज्या घडामोडी घडत आहेत त्यामध्ये शिवसैनिक कुठे हालला नाही. ज्यांनी सत्ता बदल करण्याचा प्रयत्न केला त्यांच्याविरोधात हा शिवसैनिक एकत्र झाला आहे. एखाददुसरा सोडला तर एकही निवडून येणार नाही, हे मला शिवसैनिक सांगत आहेत. सत्तापरिवर्तन झाले ते लोकांना आवडलेले नाही. शिवसैनिक नाराज आहेत. त्यामुळे एक वेगळं चित्र राज्यात आगामी काळात पाहायला मिळेल, असेही शरद पवार यांनी सांगितले.

राष्ट्रवादी कॉग्रेसची ताकद उभी राहणार
ओबीसी आरक्षणाच्याबाबत न्यायालयाने निकाल दिला आहे. निवडणुकीत ज्यांनी अर्ज भरले आहेत. तिथे निवडणुका घ्या आणि भरले नाहीत तिथे घेऊ नका, असा निर्णय दिल्याचे कळतेय. त्यामुळे आता निवडणूका पुढे जाण्याची शक्यता आहे. ओबीसी समाजाला घेऊन निवडणूका झाल्या पाहिजेत. ही पक्षाची भूमिका राहिली आहे. त्यामुळे ही एक संधी आपल्याला आली आहे आणि त्यातून नगरपालिका, नगरपरिषद या सर्व पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद उभी राहिल, असेही शरद पवार यांनी सांगितले .

Exit mobile version