। कोलाड । वार्ताहर ।
पाथरशेत गावापासून 800 मीटर अंतरावर श्री भैरवनाथ मंदिर आहे. या मंदिरावर मंगळवारी (दि.22) मध्यरात्रीच्या सुमारास मंदिरावरील कळस कोसळला. हा कळस वीज पडल्याने कोसळला की, वैयक्तिक वादामुळे पाडला, याबाबत ग्रामस्थांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. रात्री ढगांच्या कडकडासह पाऊस झाल्याने मंदिरावर वीज कोसळली असावी, असा ही अंदाज वर्तविला जात आहे.
गावचे पुजारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास पूजेसाठी मंदिरात आले असता त्यांना हा प्रकार दिसला. त्यांनी तात्काळ गावात जाऊन ग्रामस्थांना सांगितले व लगेच कोलाड पोलीस ठाणे येथे सांगितले. कोलाड पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मोहिते यांच्या पथकाने पाथरशेत गावात जाऊन मंदिराची पाहणी केली. परंतु पाथरशेत पंचक्रोशी यांनी त्याच संध्याकाळी ग्रामसभा घेतली व वीज पडून मंदिराचे नुकसान झाले असेल, असे ग्राह्य धरले आहे. यामध्ये मंदिराचे प्रचंड नुकसान झाले आहे.
मंदिराच्या वर तांब्याचा कळस आहे. त्याचे चार-पाच तुकडे झाले आहेत. तर मंदिरातील पत्र्याच्या शेडचे नुकसान झाले असून मंदिरातील सर्व लाईट फिटिंग जळली आहे. लाईटचे बोर्ड ही तुटले आहेत. ट्यूबलाईट, फॅन, बाहेरचे हॉलिजन याचे नुकसान झाले आहे. ही नैसर्गिक आपत्ती असेल तर शासनाने मंदिराची पुन्हा एकदा बांधणी करून देण्याची ग्रामस्थांची मागणी आहे. वैयक्तिक प्रकार असेल तर अधिक तपास करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात असुन पुढील तपास कोलाड पोलीस ठाण्याचे सपोनि नितीन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.