। रोहा । वार्ताहर ।
अल्पवयीन मुलीला लग्नाच्या भूलथापा देत अनैतिक संबंध ठेवल्याचा प्रकार कोलाड विभागातील गौळवाडी येथे घडला आहे. दीपक संतोष जाधव (रा. गौळवाडी) असे आरोपीचे नाव असून 1 नोव्हेंबर ते 21 नोव्हेंबर यादरम्यान रात्रीच्या वेळी पाथरशेत आदिवासीवाडी येथील अल्पवयीन मुलगी व तिचे आई-वडील असे आरोपीच्या घरी झोपले होते. यावेळी आरोपीने पीडितेजवळ जाऊन माझे लग्न जमले आहे; परंतु मी त्या मुलीसोबत लग्न करणार नाही. मी तुझ्यासोबत लग्न करतो, अशा भूलथापा देत तिच्यावर अत्याचार केले.
काही दिवसानंतर पीडित मुलगी गर्भवती राहिल्याने ही घटना उघडकीस आली. त्यानंतर पीडितेच्या आईने थेट कोलाड पोलीस ठाणे गाठत आरोपी दीपक जाधवविरोधात तक्रार दाखल केली. या घटनेतील आरोपी फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक नितीन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सूर्यकांत भोजकर तपास करत आहेत.