ऑस्ट्रेलियावर मिळवला ऐतिहासिक कसोटी विजय
। मुंबई । वृत्तसंस्था ।
भारतीय संघाने बॉर्डर गावस्कर ट्रॉफीतील पहिल्याच कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा दारूण पराभव केला आहे. पर्थच्या अभेद्य बालेकिल्ल्यात भारताने ऑस्ट्रेलियावर 295 धावांनी मोठा ऐतिहासिक विजय मिळवला आहे. यशस्वी जैस्वालच्या 161 धावा आणि विराट कोहलीच्या शतकाच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाला विजयसाठी 533 धावांचे लक्ष्य देत डाव घोषित केला होता. पहिल्या डावात 150 धावांवर सर्वबाद झाल्यानंतर भारताच्या गोलंदाजांनी ऐतिहासिक पुनरागमनात मोठी भूमिका बजावली. भारतीय संघाने बॉर्डर गावस्कर ट्रॉफीची ऐतिहासिक विजयाने सुरूवात केली आहे. जसप्रीत बुमराह, यशस्वी जैस्वाल भारताच्या विजयाचे शिल्पकार ठरले.
जसप्रीत बुमराहने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण भारताला पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाच्या भेदक गोलंदाजीसमोर फार धावा करता आल्या नाहीत आणि टीम इंडिया 150 धावा करत सर्वबाद झाली. यानंतर भारताच्या गोलंदाजांनी तर कहर केला. 150 धावांच्या आघाडीसह गोलंदाजी करताना भारताच्या गोलंदाजांनी कांगारू संघाच्या फलंदाजांना फार काळ मैदानावर टिकू दिले नाही. सुरूवातीच्या षटकांमध्ये जसप्रीत बुमराहने भेदक गोलंदाजी करत झटपट 3 विकेट्स गमावले. यानंतर सिराज, हर्षित राणाने बुमराहला साथ देत कांगारू फलंदाजीचे कंबरडे मोडले.पहिल्या डावात भारताकडून जसप्रीत बुमराहने 5 विकेट्स घेतले. तर पदार्पणवीर हर्षित राणाने ट्रेव्हिस हेडला क्लीन बोल्ड करत त्याची पहिली आंतरराष्ट्रीय कसोटी विकेट मिळवली, यासह त्याने पहिल्याच सामन्यात 3 विकेट्स मिळवल्या. तर सिराजने 2 विकेट्स आपल्या नावे केला. भारतीय संघ पहिल्या डावातील 46 धावांच्या आघाडीसह फलंदाजी करण्यासाठी उतरला. दुसर्या डावात तर भारताच्या सलामीवीरांनी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना विकेट्ससाठी तंगवलं. केएल राहुल आणि यशस्वी जैस्वालने 201 धावांची ऑस्ट्रेलियामध्ये भारताकडून सर्वात मोठी भागीदारी रचत मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. यशस्वी जैस्वालने पहिल्याच ऑस्ट्रेलिया कसोटीतील पहिल्या कसोटीत शतक झळकावत इतिहास घडवला. यशस्वीने 161 धावांची तर राहुल 77 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. तर त्यानंतर ऑस्ट्रेलियासाठी कायमचं कर्दनकाळ ठरलेल्या विराट कोहलीने आपल्या पुनरागमनाचा डंका वाजवत 143 चेंडूत वादळी शतक झळकावले. भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच पर्थच्या स्टेडिमयवर ऑस्ट्रेलियाला पराभूत करणारा पहिला संघ ठरला आहे.