। मुंबई । वृत्तसंस्था ।
मुंबई इंडियन्सने लिलावाच्या पहिल्या टप्प्यात मूक साक्षीदार म्हणून राहणं पसंत केलं. पण दुसर्या टप्प्यात त्यांनी नेहमीच्या खाक्याला जागत ट्रेंट बोल्टच्या रुपात डावखुरा वेगवान गोलंदाज ताफ्यात सामील केला. बोल्टसाठी मुंबईला 12.50 कोटी रुपये मोजावे लागले. काही वर्षांपूर्वी बोल्ट मुंबईकडेच होता. वानखेडेवर बुमराह आणि बोल्ट यांना पाहणं ही चाहत्यांसाठी पर्वणी असेल. दरम्यान गेल्या हंगामात त्यांच्याकडेच असणार्या नमन धीरसाठी मुंबईने 5.25 कोटी रुपये मोजले.
मुंबई संघाने आयपीएलपूर्वी संघातील पाच मुख्य खेळाडूंना रिटेन केलं. यामध्ये कर्णधार हार्दिक पंड्या, रोहित शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह यांचा समावेश आहे. मुंबई संघाने सर्वोत्कृष्ट जसप्रीत बुमराहला 18 कोटी अशा सर्वाधिक किंमत देत संघात कायम ठेवलं आहे. यंदाच्या आयपीएल लिलावात मुंबईचा संघ यष्टीरक्षक आणि गोलंदाजांची निवड करणार आहे.
आयपीएल 2025 रिटेन्शनच्या नियमानुसार मुंबई इंडियन्सने पाच खेळाडूंना संघात कायम ठेवले. ज्यामध्ये जसप्रीत बुमराहला 18 कोटी सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्या यांना प्रत्येकी 16.35 कोटी रोहित शर्माला 16.30 कोटी आणि तिलक वर्माला 8 कोटी रुपयांसह रिटेन केलं. रिटेन्शननंतर मुंबई संघाकडे 120 कोटींपैकी 55 कोटींसह लिलावात उतरणार आहे.