। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल शहरातील अभिनव युवक मित्र मंडळाच्या माध्यमातून विभागातील सर्व आजी-माजी क्रिकेटपटूंसाठी पायोनिअर प्रिमियर लिग 2025 या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये नितीन पाटील यांच्या पायोनिअर पँथर्स संघाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. ही स्पर्धा ही शनिवारी (दि.12) सुकापूर येथील सॉकर सिटी येथे संपन्न झाली.
पायोनिअर विभागात आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत 4 संघ सहभागी झाले होते. त्यामध्ये पायोनिअर किंग कर्णधार अल्पेश पाडावे, पायोनिअर टायगर्स कर्णधार मयुर चिटणीस, पायोनिअर मराठा कर्णधार शैलेश कदम व पायोनिअर पँथर्स कर्णधार राजा चव्हाण हे होते. या स्पर्धेचे उद्घाटन पनवेलमधील माजी क्रिकेटपटू सुधीर देसाई व रायगड पत्रकार प्रेस क्लबचे सल्लागार संजय कदम यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेसाठी मोठ्या प्रमाणात क्रिकेटप्रेमी सहभागी झाले होते.
या स्पर्धेतील प्रत्येक सामना हा अतितटीचा झाला. अनेक आजी-माजी दिग्गज खेळाडूंनी यात सहभागी होऊन आपल्या खेळाची नजाकत दाखवली. अंतिम सामना हा पायोनिअर मराठा व पायोनिअर पँथर्स यांच्यात रंगला. अंतिम क्षणी पायोनिअर पँथर्स निर्णायक विजय मिळवला. यावेळी विजयी संघाला मंडळाचे कार्याध्यक्ष नितीन पाटील, रायगड प्रेस क्लबचे सल्लागार संजय कदम, माजी क्रिकेटपटू सुधीर देसाई, चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते बक्षीस वितरित करण्यात आले.