बेकायदा लाल माती खोदकामावर कारवाईची मागणी
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील आदिवासी भागातील चार ग्रामपंचायतीमधून लाल मातीची तस्करी सुरु आहे. त्याबाबत तब्बल एक ते दीड वर्षांनी महसूल खात्याने लाल माती चोरून नेणारे ट्रक पकडले आहेत. एकावेळी दहापेक्षा अधिक ट्रक लाल माती नेण्यासाठी आले असताना कर्जत तहसीलदार यांनी धाड टाकल्यानंतर आता भीतीने दूर राहणारे शेतकरी हे माध्यमांच्या पुढे येऊ लागले आहेत. चाफेवाडी जवळील घुटे वाडी येथील शेतकरी हेमंत हिंदोळा हे पुढे आले असून त्यांनी आपल्या शेतीचे नुकसान करणार्या लोकांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी केली आहे.
7 एप्रिलच्या रात्री कर्जत तहसीलदार डॉ. धनंजय जाधव यांनी लाल माती घेऊन जाणारे ट्रक यांच्यावर स्वतः पुढे येत कारवाई केली होती. या धडक कारवाई करत नांदगाव बलिवरे खांडस या भागातून होणार्या लाल मातीच्या तस्करीचा पर्दाफाश केला आहे. धडक कारवाई करत तीन हायवा गाड्या जप्त करण्यात आल्या तर जवळपास नऊ गाड्या या कारवाईमध्ये पकडण्यात आल्या होत्या. त्यासोबतच एक जेसीबीदेखील पकडण्यात आला आणि लाल मातीच्या चोरी प्रकरणातील माहिती समाज माध्यमांवर झळकली आणि असंख्य आदिवासी शेतकरी पुढे येऊ लागले आहेत.
लाल मातीची तस्करी करण्यासाठी ज्या शेतकर्यांनी नांदगाव, खांडस, ओलमन आणि पाथरज या ग्रामपंचायत हद्दीत जमिनी खरेदी करून ठेवल्या आहेत. त्या जमिनी हेरून त्या ठिकाणी जाण्यासाठी दिवसा रस्ता तयार करून ठेवायचा. त्यानंतर जेसीबी मशीनचे साहाय्याने त्या जागेमध्ये खरोखर लाल माती आहे काय? याची खात्री करण्यासाठी थोडेसे खोदकाम करून ठेवले जाते. त्यानंतर पुढील दोन तीन रात्री स्थानिक मदतगार हे जेसीबी मशीनचे साहाय्याने लाल माती खोदून देण्यासाठी मदत करणारे यांच्या मदतीने आठ ब्रास मातीची वाहतूक करणारे हायवा ट्रक यांच्या माध्यमातून तस्करी चालते.
मात्र, राजकीय वरदहस्त असल्याने त्या बड्या नेत्याच्या पुढे स्थानिक आदिवासी लोक मूग गिळून बसतात आणि कोणतंही तक्रार करीत नाहीत. मात्र, तहसीलदार कर्जत यांच्याकडून झालेल्या कारवाई नंतर अनेक शेतकरी पुढे येत आहेत. आपल्या जमीनीतून होणार्या मातीच्या तस्करीबाबत आवाज उठवल्यावर समाज माध्यमांवर महसूल खात्याचे कौतुक होऊ लागल्याचे पाहून चाफेवाडी येथील घुटेवाडीतील आदिवासी शेतकरी बांधव हेमंत हिंदोळा यांनी थेट संपर्क करून आपल्या शेतातील माती देखील चोरीला गेल्याची तक्रार मांडली आहे. शेतकरी हेमंत हिंदोळा यांच्या मालकीच्या जागेतून अवैधरित्या खोदकाम करून लाल माती काढल्यानांतर त्या जमिनीचे नुकसान करून लाला मातीचे तस्कर अन्य ठिकाणी जमिनी शोधण्यासाठी निघून गेले आहेत. आदिवासी समाजाचे असल्याने भीतीपोटी हिंदोळा यांनी कोणतेही तक्रार दाखल केली नव्हती. मात्र, ही चोरटी वाहतूक रात्रीच्या वेळी होत असल्याने आपण त्यांना विरोध करण्यासाठी जाऊ शकलो नाही. याचे कारण ते ट्रक या भागातून भरधाव वेगाने जातात आणि त्यामुळे रात्रीच्या अंधारात त्यांना जाब विचारायला गेलो तर ते लाल मातीचे तस्कर काय करतील याचा भरोसा नसल्याचे या शेतकर्यांचे म्हणणे आहे.
स्थानिकांच्या आशीर्वादाने तस्करी सुरु
लाल मातीची तस्करी होत असताना यामध्ये स्थानिक पातळीवरील कोणीतरी माहिती पुरवत असल्याचा संशयदेखील स्थानिक शेतकर्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे हे माती माफिया राजकीय वरदहस्ताने मातीची तस्करी करत आहेत, याचा शोध घेणे हे मोठे आव्हान तहसीलदार डॉ धनंजय जाधव आणि पोलीस प्रशासनाच्या समोर आहे. इतकेच नव्हे तर या माती माफियांवर कधी कारवाई होते हेदेखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.