मनोज भुजबळ यांची दुरूस्तीची मागणी
| पनवेल | प्रतिनिधी |
नवीन पनवेल सेक्टर-13 ए टाईप येथील जीर्ण झालेली पाणीपुरवठा पाईपलाईन बदलून नवीन पाईपलाईन टाकावी, तसेच अत्यंत जुनी व जीर्ण अवस्थेत असलेली ड्रेनेज लाइन दुरुस्त करण्याची मागणी नगरसेवक मनोज भुजबळ यांनी आयुक्त मंगेश चितळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मनोज भुजबळ यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नवीन पनवेल सेक्टर 13 ए टाईप परिसरातील अंतर्गत ड्रेनेज सिव्हरेज लाईन ही अत्यंत जुनी व जीर्ण अवस्थेत असून अनेक ठिकाणी तुटलेली व चोकअप झालेली आहे. त्यामुळे सांडपाणी रस्त्यावर येत असून दुर्गंधी व विविध आजार पसरत आहे. या समस्येमुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे. पावसाळ्याच्या काळात परिस्थिती अधिकच गंभीर होते व नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. तरी सेक्टर 13 ए टाईप येथील अंतर्गत ड्रेनेज सिव्हरेज लाईनची तातडीने पाहणी करून, ती योग्य पद्धतीने दुरुस्त करून चांगल्या दर्जाची नवीन लाईन टाकून देण्यात यावी.
तसेच, या परिसरात असलेली पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन ही अत्यंत जीर्ण व जुनी झालेली आहे. या पाईपलाईनमधून वारंवार गळती होत असल्यामुळे बाहेरील गटाराचे व पावसाचे खराब पाणी त्या पाईपमधून पिण्याच्या पाण्यात मिसळते. त्यामुळे नागरिक वारंवार विविध आजारांनी ग्रस्त होतात. तसेच, पाण्याच्या दाबामध्ये देखील मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना अत्यल्प प्रमाणात पाणी मिळत असून अनेक घरांपर्यंत पाणी वेळेवर व पुरेशा प्रमाणात पोहोचत नाही, याबाबत वारंवार तक्रारी करूनही अद्याप कायमस्वरूपी उपाययोजना झालेली नाही. तरी ही जीर्ण झालेली पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन तातडीने काढून त्या ठिकाणी नवीन व क्षमतेची पाईपलाईन टाकून देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.






