कृषीवलच्या दणक्याने प्रशासनास जाग

हेटवणे येथील खड्डे तात्काळ बुजविले

| रोहा | वार्ताहर |

सुतारवाडीपासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या हेटवणे बसथांब्याजवळील गतिरोधकासमोर खड्डे पडले होते. या खड्ड्यांचा अनेक दिवसांपासून वाहन चालकांना त्रास होत होता. याबाबत कृषीवलने आवाज उठवताच संबंधित प्रशासनास जाग आली. त्यानंतर हे खड्डे तात्काळ बुजविण्यात आले आहेत. त्यामुळे सर्व स्तरातून कृषीवलचे आभार मानण्यात येत आहेत.

रस्त्यावर अनेक ठिकाणी पडलेल्या खड्ड्यांची डागडुजी करून रस्ता सुस्थितीत केला, त्यामुळे नागरिकांना तसेच जाणार्‍या-येणार्‍या वाहनचालकांचा प्रवास सुखकर झाला आहे. कोलाड-सुतारवाडीमार्गे पुण्याकडे जाण्यासाठी तसेच पुण्यावरून रोहा मार्गाकडे येण्यासाठी अनेक लहान-मोठ्या वाहनांची सातत्याने वर्दळ असते. त्याचप्रमाणे विळे भागाड या ठिकाणी कंपन्या वसलेल्या असल्यामुळे सातत्याने अवजड सामान घेऊन तसेच पक्क्या मालाची वाहतूक सतत चालू असते, त्यामुळे येथील रस्ता सुस्थितीत असणे अत्यंत आवश्यक आहे. पूर्वी कोलाड ते विळे भागडदरम्यान रस्ता सुस्थितीमध्ये होता. मात्र, आता या मार्गावरून सतत मोठमोठ्या अवजड वाहनांची त्याचप्रमाणे अनेक वाहनांची सातत्याने ये-जा होत असल्यामुळे रस्ता खराब होत चाललेला आहे. हेटवणे येथील गतिरोधकासमोरील खड्डे बुजवल्यामुळे अनेकांनी कृषीवलला धन्यवाद दिले आहेत.

Exit mobile version