कर्नाळा अभयारण्यातील चोरीचा डाव उधळला

चोरांचे मुद्देमाल टाकून पलायन

| रायगड | खास प्रतिनिधी |

मुंबई-गोवा महामार्गावर कर्नाळा पक्षी अभयारण्यात चोरीचा प्रकार रोखण्यास एका तरुणाला यश आले आहे. मात्र, चोर पळून जाण्यास यशस्वी झाले असून, त्यांनी चोरलेला मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. चोरीची ही घटना गुरुवारी (दि.27) रोजी पहाटेच्या सुमारास घडली आहे.

कर्नाळा पक्षी अभयारण्य हे पर्यटकांचे आकर्षण आहे. शिवाय येथील कर्नाळा किल्ला पाहायला पर्यटकांची कायमच गर्दी असते. मुंबई-गोवा महामार्गावर पनवेल जवळ कर्नाळा अभयारण्य आहे. येथे प्राण्यांच्या संरक्षणासाठी लोखंडी पत्रे लावले आहेत. गुरुवारी पहाटे दोन-अडीचच्या सुमारास अभयारण्यात हे पत्रे चोरून एका टेम्पोत ठेवण्यात आले. त्याचवेळी मुंबईहून पेणच्या दिशेने जाणार्‍या तरुणांच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यांनी गाडी थांबवली आणि एका तरुणाने पत्रे का चोरता असे विचारले. एवढेच नाही तर त्याने लगेचच पनवेल पोलिसांना मोबाईलवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तरुणाने पोलिसांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरु केल्यानंतर आरोपींनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला.

त्यावेळी त्यांच्यामध्ये बाचाबाची आणि झटापट झाली. पहाटेची वेळ असल्यामुळे अंधार होता. त्याचा फायदा घेत ते दोन-तीन चोर संरक्षण भिंतीवरून उडी मारून जंगलात पळून गेले. तोपर्यंत त्या तरुणांनी 100 नंबरवर संपर्क साधून पोलिसांना माहिती दिल्यावर काही वेळातच निर्भया पथकाचे शिल्पा कवी आणि धनंजय पाठारे घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी पहाटे साडेतीनच्या सुमारास लोखंडी पत्रे असलेला टेम्पो जप्त केला आहे.

Exit mobile version