प्लास्टिक बंदी मोहीम थंडावली

पथकाकडून मोहिमेकडे दुर्लक्ष; पालिका अधिकारी हतबल

| पनवेल | वार्ताहर |

राज्य सरकारने 75 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीचे तसेच सिंगल यूज प्लास्टिक पिशवीवर बंदी घातली आहे. मात्र, पनवेल पालिकेकडून प्लास्टिक बंदीची मोहीम थंडावल्याने शहरात खाद्यपदार्थ विक्रेते, हॉटेल, उपाहारगृहे, हातगाडीवाले, छोटे-मोठे व्यावसायिक अशा सर्वच घटकांकडून बंदी असलेल्या प्लास्टिकचा सर्रास वापर सुरू आहे.

पनवेल महापालिकेकडून प्लास्टिकवर सर्रास कारवाई होत असली तरीही पिशव्यांचा वापर सुरू झाला आहे. काही दिवसांपूर्वी मार्केटमधील काही व्यावसायिकांना दंड ठोठावला होता. त्यानंतर पथकाकडून मोहिमेकडे दुर्लक्ष होत असल्याने भाजी आणि डेली बाजारात कमी मायक्रॉनच्या पिशव्यांचा सर्रास वापर केला जात आहे. या पिशव्यांतून मटण, चिकन-अंडी, दही, खाद्यतेल, फळांची विक्री केली जात आहे. कमी पिशव्यांचा खुलेआम वापर होत आहे. हॉटेल, उपाहारगृहे आणि खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर कमी मायक्रॉनच्या पिशव्यांच्या वापर सुरू आहे. तरी गेल्या महिन्यात पालिका क्षेत्रात 115 किलो प्लास्टिक जप्त केले असून 35 हजारांपेक्षा जास्त दंड आकारण्यात आला आहे. तरी पालिका क्षेत्रात सर्रासपणे प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर होत असल्याने पालिका अधिकारी हतबल झाले आहेत.

अशी आहे दंडाची तरतूद
शहरातील नागरिक, दुकानदार, व्यापारी वर्गाला 75 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीचे, तसेच सिंगल युज प्लास्टिक आढळल्यास त्यांच्यावर प्रथम वेळेस पाच हजार, दुसऱ्या वेळेस आढळल्यास दहा हजार दंड ठोठावला जातो. मात्र, तिसऱ्या वेळी आढळल्यास 25 हजारांचा दंड आणि तीन महिन्यांचा कारावास अशा प्रकारे कायदेशीर कारवाई करण्यात येते. यात प्लास्टिक पिशव्या, प्लास्टिक कव्हर असलेले मिठाईचे बॉक्स, थर्माकोल व डिस्पोजेबल प्लास्टिकचे ताट, कप, प्लेट, ग्लास आदींचा समावेश आहे.
कापडी पिशव्यांचा वापर नगण्य
जागरूक नागरिक, नामवंत खाद्यपदार्थ व्यावसायिकांनी कापडी आणि कागदी पिशव्यांचा वापर सुरू केला असला, तरी त्यांचे प्रमाण कमी आहे. हॉटेलमध्ये पॅकेजिंगसाठी वापरण्यात येणारी भांडी, वाट्या, स्ट्रॉ, नॉन वोव्हन पॉलिप्रॉपलिन बॅग्ज, प्लास्टिक पाऊचला बंदी असताना त्यांचा सर्रास वापर होत असल्याचे दिसून येते.
Exit mobile version