दोन वर्षांपासून बेंचवर बसलेल्या या खेळाडूचे होणार आयपीएलमधून पदार्पण

। मुंबई । प्रतिनिधी ।
क्रिकेट विश्‍वातील देव, संपूर्ण जगावर राज्य करणार्‍या, भारतीय संघाच्या दिग्गज फलंदाज सचिन तेंडूलकर यांचा मुलगा अर्जून गेले दोन वर्ष संधीच्या प्रतीक्षेत आहे. अर्जून मुंबई इंडियन्स या संघाचा भाग असला तरी, त्याला अद्याप खेळण्याची संधी मिळाली नाही. यावर्षी मात्र मुंबई इंडियन्स या संघाने अर्जूनचा 30 लाखात पुन्हा एकदा संघात समावेश केला आहे.


आयपीएलच्या प्ले ऑफ शर्यतीतून बाहेर पडलेली मुंबई इंडियन्सने या मोसमात आतापर्यंत 13 सामने खेळले आहेत, मात्र अर्जुनला खेळण्याची संधी अद्याप मिळालेली नाही. आता मुंबई इंडियन्सला 21 मे रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध लीगचा शेवटचा सामना खेळायचा आहे आणि अर्जुनला त्या सामन्यातून पदार्पण करताना पाहण्याची अनेकांची इच्छा आहे. यावर स्वतः मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने याबाबतचे संकेत दिले आहेत.


मंगळवारी सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर रोहितने मुंबईच्या प्लेइंग इलेव्हनमधील दोन बदल सांगितले. रोहित म्हणाला की, पुढच्या हंगामासाठी त्यांना प्रयोग करायचा आहे. नवीन वर्षासाठी खेळाडूंची चाचणी करायची आहे. तो पुढे म्हणाला की, यानंतर आमचा आणखी एक सामना आहे आणि आम्ही त्या सामन्यात आणखी काही खेळाडूंना आजमावू शकतो. त्यामुळे रोहितच्या वक्तव्यावरून असे दिसते की अष्टपैलू अर्जुनला पुढील सामन्यात मुंबई इंडियन्सच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळू शकते.


अर्जुनला पाच वेळचा चॅम्पियन मुंबईने गेल्या मोसमात 20 लाख रुपयांत खरेदी केले होते, पण त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही आणि या हंगामातही त्याला बेंचवर बसून राहावे लागले. तथापि रोहितच्या या वक्तव्यामुळे अर्जुनला नक्कीच दिलासा मिळाला असेल.

Exit mobile version