वणव्यामुळे गुरांचे हाल

| सुतारवाडी | वार्ताहर |

येरळ गावाच्या सीमेवरील मैदानामध्ये अचानकपणे आलेल्या वणव्यामुळे एकच तारांबळ उडाली. या वणव्याबाबत येथील स्थानिक रहिवासी हरिश्चंद्र कुर्ले यांनी सांगितले की, हा वणवा येलदरा नदीकडून धगडवाडी मार्गाकडून येरळ गावाकडील मोकळ्या मैदानाकडे आला. या मैदानामध्ये परिसरातील गुरं चरत असताना अचानकपणे दि. 7 डिसेंबर रोजी सकाळी 10.30 च्या सुमारास प्रचंडपणे आगीचा भडका होऊन वाऱ्यामुळे आग मोठ्या प्रमाणावर पसरत गेली. त्यामुळे गुरं सैरावैरा पळत गेली.

ग्रामीण भागातील गुरांना मोकळ्या मैदानातील गवत मोठ्या प्रमाणावर मिळत असल्यामुळे ती गुरं चरत असताना अचानकपणे वणवा लागला. यामध्ये क्षणात सुमारे 100 ते 150 एकरातील चारा आगीच्या भक्षस्थानी गेल्यामुळे गुरांच्या वैरणीचा प्रश्न बळीराजाला पडला आहे. अचानकपणे आलेल्या वणव्याने धुराचे आणि आगीचे लोट दिसताच आदिवासी बांधवांनी शर्थीचे प्रयत्न करून वणवा आटोक्यात आणला.

Exit mobile version