श्रीवर्धनमधील रस्त्यांची दुर्दशा

चार प्रमुख मार्गांवर खड्डेच खड्डे
दिघी | प्रतिनिधी |
श्रीवर्धन तालुक्यातील अंतर्गत रस्त्यांसह प्रमुख मार्ग खड्डेमय बनले आहेत. येथे पावसामुळे रस्त्यांच्या दुरवस्थेत वाढ झाली आहे. त्यामुळे वाहनधारकांना रस्त्याने मार्ग काढताना चांगलीच कसरत करावी लागते. या रस्त्यांवरून जीव मुठीत घेऊनच मार्गक्रमण करावे लागत असल्याने श्रीवर्धनकरांमध्ये संतापाची लाट आहे.
तालुक्यातील दिघी, सर्वे, म्हसळा व श्रीवर्धन या गावांना जोडणार्‍या मुख्य रस्त्यावर अगणित खड्डे पडल्याने सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कामांची चांगलीच गुणवत्ता दिसत आहे. श्रीवर्धन तालुक्यातील शेखाडीमार्गे श्रीवर्धन, श्रीवर्धन ते बोर्ली तसेच बोर्लीपंचतन ते दिघी व आदगाव या प्रत्येक मार्गाला 16, 17 व 13 किलोमीटर अंतरानी जोडले गेले आहे. जवळपास 70 किलोमीटर रस्ते क्षेत्रामध्ये संपूर्ण तालुक्यातील या गावांना विभागले आहे. मात्र, या सर्वच रस्त्यांवर सध्या वाहने चालवणे सोडाच; पण चालणेदेखील जिकिरीचे झाले आहे.
तालुक्यातील बहुतेक रस्ते हे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारित येतात. मात्र, रस्त्यांच्या दुरुस्तीकडे सार्वजनिक बांधकाम खात्याचे लक्ष नाही. परिणामी, पावसाळ्यात नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. येथे पावसाळा आणि रस्त्यावरील खड्डे याचे कारण पुढे करण्यात येते. पावसाळ्यात खड्डे पडणे स्वाभाविक असले तरी त्यानिमित्ताने राज्य शासनाच्या रस्त्याचा दर्जा कितपत आहे, त्याचे पितळच उघडे पडत असते.
खड्ड्यातील प्रवास तासन्तास
मुंबई ते श्रीवर्धन अंतर 198 किलोमीटरचे आहे. तर, पुण्याहून श्रीवर्धन 168 किलोमीटर असून, हे अंतर 5 तासांमध्ये पार केले जाते. मात्र, श्रीवर्धन तालुक्यात येणार्‍या पर्यटकांना व स्थानिक नागरिकांना येथील रस्त्याच्या दुरवस्थेमुळे मोठा त्रास होत आहे. येथील रस्त्यांची कामे रखडल्याने तास, दीड तास अवघ्या 16 किलोमीटरचे अंतर पार करण्यास लागत आहे.
मान्सूनपूर्व कामाचा विसर
पावसाळा सुरू होण्यापूर्वी बांधकाम खाते अनेक रस्त्यांची डागडुजी तात्पुरत्या स्वरूपात वार्षिक निधीतून करते. परंतु, यंदा अनेक रस्त्यांवर ही डागडुजी करण्याची गरज असतानाही या खात्याने त्याची तसदी घेतली नाही. यामुळे अख्खा पावसाळा पाण्यातून मार्ग काढत नागरिकांना घालवावा लागला.

पावसामुळे खड्डे भरता आले नाही. आता पाऊस थांबल्यामुळे रस्ता दुरुस्तीचे काम लवकरच करण्यात येईल.
सा.बां. विभाग

Exit mobile version