हॉटेल व्यावसायिकांवर परिणाम
। कोलाड । वार्ताहर ।
दिवसेंदिवस जिवनावश्यक वस्तुचे भाव गगनाला भिडत चालले असुन या महागाईमुळे सर्वसामान्य जनतेचे हाल होत आहेत. तसेच, याचा परिणाम हॉटेल व्यावसायावर देखील होत आहे. यामुळे लाडक्या बहिणीला 1 हजार 500 रु. देण्यापेक्षा महागाईचे दर कमी करण्याची मागणी सर्वसामान्य जनतेकडून करण्यात येत आहे.
खाद्य तेल, डाळ, चणापीठ, आटा, कांदे, बटाटा, लसूण, भाजीपाला या जिवनावश्यक वस्तुंचे दर गगनाला भिडले असुन यामुळे सर्वसामान्य जनतेचे जगणे मुश्किल झाले आहे. याच वस्तुंच्या दरवढीमुळे हॉटेल व्यावसायिक देखील संकटात सापडले आहेत. कारण सर्वसामान्य जनतेचा आवडता पदार्थ वडापाव या महागाईमुळे जास्त भाव खाऊ लागला आहे. यामुळे ग्राहकांनी वडापाव खाण्याकडे पाठ फिरवली असल्यामुळे याचा यामुळे हॉटेल व्यवसायावर परिणाम झाला आहे. शासनसेवेत काम करणार्या नोकरदारांना कितीही महागाई वाढली तरी काही फरक पडत नाही. कारण त्यांच्या महागाई भत्त्यात वाढ होत असते. यामुळे शासकीय लोकांना महागाईची झळ जाणवत नाही. परंतु, दिवसभर दहा-बारा तास काम करणार्या सर्वसामान्य जनतेचे या महागाईने हाल होत आहेत.
महिलांना मदतीचा हात म्हणून दर महिना 1500 रु. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. याचा फायदा खेडेगावातील काही महिलांना तांत्रीक कारणांमुळे झालेला नाही. याउलट लाखो रुपये पगार घेणार्या व्यक्तीच्या पत्नीला मात्र त्वरित लाडक्या बहिणीचे पैसे जमा झाले आहेत. तर, काही दिवसांपूर्वी एकाच माणसाने लाडक्या बहिणीचे 30 अर्ज भरून त्यातले 26 अर्ज मंजूर होऊन त्या माणसाच्या नावावर 3000 प्रमाणे 78हजार रु. जमा झाले आहेत. याला जबाबदार कोण? ही लाडकी बहीण योजना नक्की कुणासाठी? यापेक्षा महागाई दर नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे.
विश्वास बागुल,
शिवसेना ठाकरे गट, वरसगांव