धाटाव औद्योगिक वसाहतीच्या रस्त्याला ग्रहण

रखडलेले काम पूर्ण होणार केव्हा?

| चणेरा | प्रतिनिधी |

धाटाव एमआयडीसीतील नीलिकॉन व एफडीसी कंपनीच्या कॉर्नरवर गटाराच्या कामासाठी एक भला मोठा खड्डा खोदलेला होता. चक्क तेथे ठेकेदाराने मातीचा ढिगारा वाचून ठेवलेला असल्याने चिखलदेखील मोठ्या प्रमाणावर साचलेला आहे. हे काम अद्याप प्रगतीपथावर नसून, या रस्त्याचे काम गेल्या पंधरा दिवसांपासून रखडलेले आहे, त्यामुळे कामगारवर्गाना, केमिकल टँकर वाहन चालकांना ये-जा करण्यासाठी रस्ता सुस्थितीत नसल्यामुळे भयंकर मनस्ताप सहन करावा लागत आहे.

सध्या पावसाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे त्या ठिकाणी पाणी साचून राहिल्याने रात्रीच्या वेळी एखाद्या वाहनाला अंदाज आला नाही तर एखादा अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता रखडलेल्या रस्त्याचे ग्रहण सुटणार कधी? अपूर्ण काम पूर्ण होणार कधी, असा सवालदेखील कामगारवर्गातून उपस्थित केला जात आहे.

हा रस्ता रहदारीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असून, अनेक गावांनादेखील जोडणारा रस्ता आहे. रस्त्याच्या बाजूलाच निलिकॉन, एफडीसी, मजदा, रोहाडाय असे अनेक कारखाने असून, पलीकडे किल्ला धाटाव, बारसोली हे गावदेखील त्या ठिकाणी बसलेले आहे. तर, रस्त्याच्या विरुद्ध बाजूस अंशुल, युनिकेम, एक्सेल, एंथिया, सॉल्वे हे कारखाने आहेत. रोड बुद्रुक, मलखंडवाडी, तळाघर, महादेव वाडी यांच्या दृष्टीने हा रस्ता जोडरस्ता आहे. दररोज हजारो संख्येने नागरिक, कामगार, शाळकरी विद्यार्थी, ट्रान्सपोर्टच्या गाड्या ये-जा करीत असतात.

दरम्यान, एक महिन्यापासून एमआयडीसीची अनेक ठिकाणी खोदकामे सुरू आहेत. हे खोदकाम करण्यासाठी आणलेली मशीनरी पूर्णतः कार्यरत नव्हती. मागील पंधरा दिवसांपासून ती बंद अवस्थेत होती. याबाबत एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना पत्रकारांनी जाब विचारल्यानंतर तेथे लगेच दोन ते तीन दिवसांनी ती मशीनरी हटवून रस्त्याचे तात्पुरते काम चालू करण्यात आले. त्यानंतर तेथे अद्याप कोणतेही काम सुरू नसल्याने परिस्थिती जैसे थे आहे. पाऊस जोरात सुरू आहे, नाले तुडुंब वाहात आहेत. रस्त्यावर पाणी व चिखलाचे साम्राज्य त्या ठिकाणी दिसत आहे. वाहनाला मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे अशी दुर्दशा अजून किती दिवस पाहावी लागणार आहे, हेदेखील तितकंच महत्त्वाचे आहे. या धाटाव एमआयडीसीच्या अधिकाऱ्याचा ढीम्म कारभार असला तरी रस्त्या खुला करण्यासाठी अजून किती दिवस लागतील, असा सवालदेखील कामगार वर्गाने उपस्थित केलेला आहे.

याठिकाणी बिल्टअप गटाराचे काम सुरू आहे. परंतु, बाजूलाच डीपी आहे व त्या ठिकाणी वायरदेखील आहेत, त्यामुळे थांबलेले काम पाहून घेतो व हे काम लवकरात लवकर कसे पूर्ण होईल, याचा पाठपुरावा करतो.

शशिकांत गीते,
उपअभियंता एमआयडीसी

Exit mobile version