पोलिसांनी मिळवून दिले महिलेचे दागिने

| पनवेल | वार्ताहर |

घरकाम करणार्‍या महिलेच्या दागिन्यांची पिशवी हरवली होती. परंतु तांत्रिक तपासाच्या आधारे सदर पिशवी पोलिसांनी हस्तगत करून त्यातील दागिने व रोख रक्कम परत मिळवून दिल्याने महिलेच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले होते.

वाजेपुर या गावात राहणार्‍या जयश्री पाटील (वय 54 वर्षे) या पनवेलला घरकाम करण्यासाठी येत असतात. नेहमीप्रमाणे ते घरकाम करण्यासाठी पनवेलला आले तसेच त्यांनी सामान खरेदी करण्यासाठी काही रोख रक्कम व गहाण ठेवण्यासाठी सोन्याची गंठण एका पिशवीत आणली होती. कामाच्या ठिकाणी आल्यावर त्यांनी नेहमीच्या दुकानाच्या जवळ असलेले ठिकाणी पिशवी ठेवली व काम करण्यास त्या गेल्या. मात्र कामावरून परतल्यावर त्यांना नेहमीच्या ठिकाणी सदर पिशवी आढळून न आल्याने त्या घाबरल्या. त्यांनी तात्काळ पोलीस ठाणे गाठत सदर प्रकारची माहिती पनवेल शहर पोलिसांना दिली.

पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने व गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अभयसिंह शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक रवींद्र पारधी यांनी सदर गुन्ह्याचा शोध सुरु केला. त्या ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेज व तेथील सुरक्षारक्षक यांची चौकशी पारधी यांनी केली असता त्यांना एका दुचाकीचा नंबर मिळाला. त्यानंबरच्या आधारे सदर गाडीमालकाचा शोध पारधी यांनी घेतला. तसेच मालकाची भेट घेऊन माहिती दिली असता पिशवीच्या साधर्म्यामुळे ते पिशवी घरी घेऊन गेल्याचे कळले. अधिक तपासात त्या महिलेचे दागिने व रोखरक्कम त्यापिशवीत मिळून आले. यावेळी जयश्री पाटील यांनी माझी काही तक्रार नसल्याचे सांगून पनवेल शहर पोलिसांचे आभार मानले.

Exit mobile version