बागमांडला-वेश्वी जेटीवरील पोलीस चौकीची दुरवस्था

| श्रीवर्धन | प्रतिनिधी |

बागमांडला ते वेश्वी दरम्यान, चालणाऱ्या फेरी बोट सेवेच्या जेटीवर उभारलेली पोलीस चौकी सध्या अत्यंत धोकादायक अवस्थेत आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी उभारण्यात आलेली ही चौकी कोणत्याही क्षणी खाडीत कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे. चौकीच्या खाली असलेला विटांचा भराव पूर्णपणे कोसळल्याने, चौकी केवळ तीन लोखंडी खांबांच्या आधारावर उभी आहे.

बागमांडला ते वेश्वी हा भाग कोकणातील एक महत्त्वाचा जलमार्ग आहे. येथून दररोज हजारो प्रवासी आणि शेकडो वाहने फेरी बोटीने प्रवास करतात. या प्रवाशांच्या सुरक्षेवर लक्ष ठेवण्यासाठी आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी शासनाने काही दिवसांपूर्वी येथे एक कंटेनर पध्दतीची पोलीस चौकी उभारली होती. सुरुवातीला ही चौकी सुस्थितीत होती. मात्र, खाडीच्या पाण्याचा मारा सतत होत असल्याने चौकी खालील जमिनीची मोठी धूप झाली आहे. कंटेनर चौकी खालील विटांचा आणि रेचग्याचा भराव पूर्णपणे वाहून गेल्याने चौकीचा एक भाग आता अधांतरी आहे. या पोलीस चौकीची तातडीने दुरुस्ती करणे किंवा सुरक्षित ठिकाणी हलवणे आवश्यक आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी उभारलेली ही चौकी पोलिसांना जीवघेणी ठरू नये, यासाठी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड आणि श्रीवर्धन पोलिसांनी या गंभीर विषयाकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे.

प्रशासनाचे दुर्लक्ष
महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डकडे जेटीच्या देखभालीची जबाबदारी असते, तर पोलीस चौकीच्या देखभालीची जबाबदारी श्रीवर्धन पोलीस किंवा रायगड पोलीस प्रशासनाची असते. या दोन्ही विभागांपैकी नक्की कोणाच्या अखत्यारीत हे येते आणि कोण चौकीची दखल घेणार, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
Exit mobile version