पोलीस ठाण्याला पडले तडे; पोलिसांच्या जीवाला धोका

| पनवेल | प्रतिनिधी |

खांदा वसाहत खांदेश्‍वर पोलिस ठाण्याची सध्या दुरवस्था झाली आहे. नऊ वर्षांपूर्वीच या इमारतीचे लोकापर्ण करण्यात आले आहे. सध्या या ठाण्याचा कारभार पडक्या इमारतीतून चालत आहे. येथील अधिकारी, कर्मचार्‍यांना सुविधा मिळत नसल्याने त्यांची मानसिकता खचत असून, संताप व्यक्त होत आहे. सद्रक्षणाय खलनिग्रहणाय च्या अनुपालनासाठी या अवस्थेतून ठाण्याला मुक्ती कधी मिळणार असा सवाल केला जात आहे.

सध्या या इमारतीला तडे पडले आहेत. 2013 रोजी राज्याचे गृहमंत्री स्व. आर.आर. पाटील यांच्या हस्ते या इमारतीचे लोकार्पण करण्यात आले होते. या पोलीस ठाण्यामध्ये 90 पोलीस कर्मचारी, तर दहा अधिकारी कार्यरत आहेत. अधिकार्‍यांसाठी असलेले केबिनसुद्धा लहान असून, पार्टीशियन टाकण्यात आले आहे. या इमारतीमधील लाद्यासुद्धा निखळल्या आहेत. वायरलेसकरिता केबिन नसून, जिन्याच्या खाली बनविण्यात आले आहेत. अशा वातावरणात काम करताना अधिकारी, कर्मचार्‍यांची मानसिकता बिघडत आहे. त्यामुळे त्याचा कामकाजावर परिणाम होत आहे. येथील कारभार चांगला असला तरी इमारत व इतर समस्या गंभीर असल्याने याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलत चालला आहे. आहे ते ठाणे सुसज्ज करावे, अन्यथा इतरत्र जागा उपलब्ध करुन नवीन ठाणे तयार करावे, अशी मागणी सर्वसामान्यांमधून होत आहे.

पोलीस ठाण्यात दररोज 50 हून अधिक नागरिक आपल्या समस्या तसेच इतर कामानिमित्त भेटण्याकरता येत असतात. त्यांना बसण्याकरता जागा उपलब्ध नाही, तसेच सर्व स्टाफ आणि येणार्‍या नागरिकांकरिता एकच बाथरूम टॉयलेट आहे. खांदेश्‍वर पोलीस ठाणे नवीन पनवेलच्या सेक्टर 6 च्या भूंखडावर होणार आहे, अशी चर्चा अनेक वर्षे ऐकायला मिळत होती, मात्र सरकार दरबारी पत्र व्यवहारसुद्धा होऊनसुद्धा हीच अवस्था पाहायला मिळत आहे. पावसाळ्यामध्ये सर्व भिंती आतून ओलसर होत असून, पोलीस कर्मचारी व येणारे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. अनेक कर्मचारी आरोग्याच त्रास होत असल्याने रजेवर जात असतात. गृह विभागाच्या दुर्लक्षामुळे याचा फटका पोलिसांना सहन करावा लागत असून, तीव्र संताप व्यक्त होत आहे.

कायदा व सुव्यस्थेचा प्रश्‍न उपस्थित होऊ नये म्हणून काळजी घेणार्‍यांच्या प्रश्‍नांकडे खासदार, आमदारांसह इतर लोकप्रतिनिधींकडून कानाडोळा होत आहे. त्यांच्या दुर्लक्षामुळेच आज जिल्ह्यातील ठाण्यांच्या इमारतींची दुरवस्था झाल्याचे दिसते. आता तरी लोकप्रतिनिधींनी आवाज उठवून पोलीस अधिकारी, कर्मचार्‍यांचे प्रश्‍न मार्गी लावावेत, अशी मागणी होत आहे. खांदा वसाहत खांदेश्‍वर पोलिस ठाण्याच्या इमारतीच्या दुरुस्तीसाठी गृह विभागाने लवकरात लवकर उपाययोजना करणे गरजेचे आहे.

Exit mobile version