पोलीस ठाण्यांसह उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालये बनली स्मार्ट
। अलिबाग । प्रतिनिधी ।
पोलिसांच्या मदतीने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याबरोबरच पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या सोयी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील 29 पोलीस ठाणे, आठ उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालये, जिल्हा वाहतूक शाखा आणि पोलीस अधिक्षक कार्यालय असे एकूण 38 कार्यालयांना स्मार्ट पोलीस ठाण्यांचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे रायगड पोलीस हायटेक होण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र दिसून येत आहे.
रायगड पोलीस दलातील अधीक्षकांच्या अधिपत्याखाली 29 पोलीस ठाणे आठ पोलीस उपविभागीय अधिकारी कार्यालये, जिल्हा वाहतूक शाखा, जिल्हा विशेष शाखा, वाचक शाखा तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग, सायबर गुन्हे शाखा, आर्थिक गुन्हे शाखा अशी वेगवेगळी विभाग कार्यरत आहेत. जिल्ह्यात दोन 300हून अधिक पोलीस अधिकारी, कर्मचारी आहेत. त्यांच्या माध्यमातून 13 तालुक्यातील नागरिकांची सुरक्षा राखण्याचे काम केले जाते. मोर्र्चेे आंदोलने, प्रमुख मंडळींचा दौरा अशा अनेक कामांसाठी पोलिसांचा बंदोबस्त असतो. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे कामही पोलिसांमार्फत केले जाते. वेगवेगळ्या गुन्ह्यांची उकलदेखील पोलिसांमार्फत केली जाते. कार्यालये अद्ययावत करण्यासाठी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी पुढाकार घेतला. त्याची सुरुवात स्वतःपासून केली. पोलीस ठाण्यात अथवा पोलीस कार्यालयात येणार्या प्रत्येक नागरिकांना समाधान निर्माण व्हावे, यासाठी हा प्रयत्न करण्यात आला. गुन्ह्यांची उकल, कार्यालयातील कामकाज अशा सर्वच प्रकारची माहिती ऑनलाईन करण्याबरोबर कार्यालयदेखील चांगले ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला. देदिप्यमान कामगिरी केल्याबद्दल जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांना स्मार्ट पोलीस म्हणून दर्जा देण्यात आला. त्यामध्ये पोलीस अधीक्षक कार्यालयासह माणगाव, अलिबाग, पेण, खालापूर, रोहा हे 5 पोलीस उपविभागीय अधिकारी कार्यालये, एक जिल्हा वाहतूक शाखा कर्जत, नेरळ, रोहा, पाली, नागोठणे, महाड एमआयडीसी, माणगाव, अलिबाग, मांडवा सागरी, रेवदंडा, खोपोली, खालापूर, रसायनी या 13 पोलीस ठाण्यांना ए डबल प्लस क्षेणी प्राप्त झाली आहे.
कर्जत, श्रीवर्धन हे दोन उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालये कोलाड, महाड तालुका, पोलादपूर, श्रीवर्धन, दिघी सागरी, गोरेगाव, मुरूड, वडखळ, पोयनाड ही दहा पोलीस ठाणे यांना ए प्लस श्रेणी तसेच महाडमधील एक उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालये महाड शहर, म्हसळा, तळा, पेण, माथेरान, दादर सागरी हे सहा पोलीस ठाणे यांना ए श्रेणी प्राप्त झाली आहे. जिल्ह्यातील पोलीस उपविभागीय अधिकारी कार्यालयापासून पोलीस ठाण्यांना पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या हस्ते स्मार्ट पोलीस ठाण्याचा दर्जाचे प्रमाणपत्र देण्यात आले.
तपास होणार गतीने
रायगड जिल्ह्यातील वाढत्या गुन्ह्यांना आळा घालण्याचे कार्य रायगड पोलीस करतात. अशातच आता रायगड पोलीस यंत्रणा हायटेक झाल्याने रायगड जिल्ह्यातील गुन्ह्यांचा तपास अधिक वेगाने करण्यासाठी पोलीस सज्ज राहणार आहेत.