तरूणीची छेड काढणारे पोलीस निलंबित

। सिंधुदुर्ग । प्रतिनिधी ।

गोव्याला सहलीसाठी निघालेल्या पोलिसांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील एका तरुणीला अडवून तिची छेड काढत तिचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला होता. ही घटना मंगळवारी (दि.24) देवगड तालुक्यातील जामसंडे येथे ही घडली होती. याप्रकरणी देवगड पोलिसांनी सहाही आरोपींना अटक केली आहे. शुक्रवारी (दि.27) मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाचे पोलीस उपायुक्त सुहास बावचे यांनी विनयभंग करणारे पोलीस शिपाई हरिराम गीते आणि प्रवीण रानडे या दोघांना सेवेतून निलंबित केले आहे.

सिंधुदूर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील जामसंडे गावातील आनंदवाडी वळणावर एक 18 वर्षीय महाविद्यालयीन तरुणी घरी जात होती. ती एकटी असल्याचे पाहून या पोलिसांनी तिची छेड काढली. पोलीस शिपाई हरिराम गीते याने ‘माझ्या सोबत येते का? तुला वसई फिरवतो, असे सांगितले. वाहनातील अन्य पोलिसांनीही या तरुणीची टिंगलटवाळी काढून तिची छेड काढली. ती दुर्लक्ष करून जात असताना त्याने तिचा हात ओढून तिला गाडीत टाकून पळवून नेण्याचा प्रयत्न केला, हा प्रकार समजताच आसपासचे ग्रामस्थ गोळा झाले. त्यांनी या आरोपींना चोप दिला आणि देवगड पोलिसांच्या ताब्यात दिले. देवगड पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक करण्यात आली. या आरोपींपैकी दोन वसई वाहतूक शाखेतील पोलीस, तर एक जण केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (सीआयएसएफ) आणि एक जण राज्य राखीव पोलीस दलातील (एसआरपीएफ) दलात कार्यरत होते.

Exit mobile version