उरणमध्ये भावी नगरसेवकांची जय्यत तयारी
| उरण | प्रतिनिधी |
उरण नगरपरिषदेच्या निवडणुकीची घोषणा होताच ऐन थंडीच्या दिवसात राजकीय वातावरण आता तापले आहे. प्रत्येक पक्ष आता पूर्ण ताकदीनिशी मैदानात दंड थोपटून उभे राहिले आहेत. उरण नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी प्रत्येक राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते कामाला लागले आहेत. भावी नगरसेवकांनी गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे. तर अनेक इच्छुक उमेदवारांनी मतदारांना, ओळखीच्या मित्र परिवार, नातेवाईकांना फोनद्वारे संपर्क साधायला सुरुवात केली आहे. यातच सर्व राजकारण ढवळून निघत आहे.
उरण नगरपालिकेच्या सत्तेची रणधुमाळी सुरु झाली आहे. सोमवार दि. 10 नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. यानंतर उरणच्या गल्लीबोळात राजकीय तापमान चांगलेच चढले असून, कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. उरण नगरपालिकेतील एकूण 10 प्रभागांतून 21 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्षा असे 22 जनप्रतिनिधी निवडून देण्यात येणार आहेत.
नगराध्यक्ष पद महिला राखीव असल्याने राजकीय पक्षांच्या गणितात उलथापालथ झाली असून, प्रत्येक पक्षाला योग्य महिला उमेदवार शोधण्यासाठी धडपड करावी लागत आहे. या निवडणुकीत एकूण 13,311 पुरुष आणि 12,903 महिला असे मिळून 26,214 मतदारांचे भवितव्य ठरणार आहे. हे मतदारच आता उरण नगरपालिकेच्या गादीवर कोण बसवायचे हे ठरवतील. या मतदारांच्या हातात नगराध्यक्ष व नगरसेवकांचे भवितव्य अवलंबून आहे.प्रभागनिहाय मतदारसंख्या पाहिली असता प्रभाग क्रमांक 1 मध्ये पुरुष 1605, महिला 1706, प्रभाग 2 मध्ये पुरुष 1549, महिला 1613, प्रभाग 3 मध्ये पुरुष 1252, महिला 1168, प्रभाग 4 मध्ये पुरुष 1416, महिला 1321, प्रभाग 5 मध्ये पुरुष 1298, महिला 1268, प्रभाग 6 मध्ये पुरुष 1010, महिला 1049, प्रभाग 7 मध्ये पुरुष 1566, महिला 1388, प्रभाग 8 मध्ये पुरुष 955, महिला 893, प्रभाग 9 मध्ये पुरुष 1148, महिला 1145, आणि प्रभाग 10 मध्ये पुरुष 1512, महिला 1352 अशी मतदारांची आकडेवारी आहे. प्रभाग 1 ते 9 मधून प्रत्येकी 2 नगरसेवक, तर प्रभाग 10 मधून 3 नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. त्यासोबतच संपूर्ण उरण शहराच्या नेतृत्वासाठी एका नगराध्यक्षा पदासाठी निवडणूक होणार आहे. 2 डिसेंबर रोजी मतदान होणार असून, निकाल 3 डिसेंबर रोजी घोषित केला जाणार आहे. त्यामुळे केवळ काही आठवड्यांतच उरणच्या भवितव्याचा निर्णय होणार आहे.
नगराध्यक्षा पद महिला राखीव असल्याने भाजप, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट), राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा पवार गट), काँग्रेस, मनसे, शेकाप, वंचित बहुजन आघाडी, भारिप आणि स्थानिक गटांमध्ये नगराध्यक्ष उमेदवार निवडीसाठी हालचालींना वेग आला आहे. मागील निवडणुकीपेक्षा यंदाची निवडणूक चुरशीची होण्याची दाट शक्यता आहे. भावी इच्छुक नगरसेवक व नगराध्यक्ष यांनी निवडून येण्यासाठी कंबर कसली असून, मतदार नेमकी कोणाला निवडून देतो. मतदार कोणाला कौल देतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
भाजपविरोधात सर्वपक्षीय आघाडी?
नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपविरोधात अन्य पक्षविरहित आघाडी स्थापन करण्यात येणार आहे. या आघाडीच्या माध्यमातून भाजपला शह देण्याची योजना महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आखली असून, एकाच पक्षविरहित चिन्हावर निवडणूक लढविण्याची रणनीती आखण्यात येत आहे.
चार वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर उरण नगरपरिषदेच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. उनपच्या या निवडणुकीसाठी भाजपने मित्रपक्षांना डावलून स्वबळावर निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची जय्यत तयारी सुरू केली आहे. भाजप विरोधात महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही ताकदीनिशी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र, 21 सदस्य आणि एक नगराध्यक्षपद अशा 22 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून आतापर्यंत तब्बल 33 इच्छुकांनी निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या इच्छुक उमेदवारांच्या भाऊगर्दीमुळे आघाडीच्या नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे.







