। नाशिक । प्रतिनिधी ।
दिंडोरी, धुळे व नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकच्या मैदानात उतरत असताना त्याच दिवशी म्हणजे 15 मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रमुख शरद पवार हे देखील नाशिकच्या मैदानात उतरत आहेत. त्यांच्या जोडीला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे देखील असणार असल्याने पाचव्या टप्प्याच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील राजकारण तापणार असल्याचे दिसून येत आहे.
20 मे रोजी मुंबई, ठाणे, कल्याण, नाशिक, धुळे व दिंडोरी या मतदार संघासाठी निवडणूक होणार आहे. सध्या मुंबईचा प्रचार शिगेला पोहोचला असून महाविकास आघाडी व महायुतीसाठी नाशिक, धुळे व दिंडोरी हे तीनही मतदार संघ महत्त्वाचे आहेत. त्यामुळे या तिन्ही मतदारसंघात बाजी मारण्यासाठी व देशभर एक सकारात्मक संदेश देण्यासाठी महाविकास आघाडी व महायुतीने कंबर कसली आहे. महायुतीच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पिंपळगाव बसवंत या कांद्याच्या आगारात सभा घेणार आहेत. त्याच दिवशी खासदार शरद पवार यांच्यादेखील दिंडोरी व नाशिकमध्ये सभा होणार आहेत. तसेच, याचदिवशी उद्धव ठाकरे यांचीदेखील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर सभा होणार असून महाविकास आघाडीच्यावतीने शरद पवार व उद्धव ठाकरे दोघेही एकाच व्यासपीठावरून नाशिककरांना संबोधित करणार आहेत.