जीर्ण अवस्थेकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष; अखेर ग्रामस्थांनी घेतला पुढाकार
। रेवदंडा । प्रतिनधी ।
अलिबाग तालुक्यातील रेवदंडा हायस्कूलजवळील एस.टी. बस थांब्याची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. या थांब्यात धुळीचे आणि कचर्याचे साम्राज्य पसरले असून, स्थानिक लोकप्रतिनिधींचे याकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. हा थांबा विद्यार्थ्यांसह या ठिकाणी येणार्या पर्यटकांसाठी महत्त्वाचा बिंदू आहे. परंतु, या बस थांब्याच्या दुरवस्थेमुळे एसटीची वाट पाहण्यासाठी बाहेरच ताटकळत उभे राहावे लागत आहे. त्यामुळे रेवदंड्यातील ग्रामस्थांनीच पुढाकार घेऊन स्वतःच्या खर्चाने बसथांब्याचा कायापालट करण्याचा निर्णय घेतला आहे.
रेवदंडा हायस्कूल येथील बसथांबा सुमारे 10 ते 12 वर्षांपूर्वी उभारण्यात आला होता. आणि तेव्हापासून आतापर्यंत या थांबाच्या देखभाल, दुरूस्तीचे कोणतेही काम लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत आणि संबंधित प्रशासनाकडून करण्यात आले नसल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या मनात प्रचंड नाराजी आहे. रेवदंडा ग्रामपंचायत ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या नेतृत्वाखाली असताना देखील या समस्येकडे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे आपले गाव सुंदर व स्वच्छ कसे दिसेल, ही रेवदंडाकरांची जवाबदारी असून, रेवदंडा थांब्याचे नीटनेटकेपण आणि देखभाल ही गावाच्या प्रतिमेसाठी अत्यंत गरजेची आहे. त्यासाठी स्थानिक नागरिकांनी पुढाकार घेत स्वखर्चातूनच या थांब्याच्या रंगरंगोटीचे काम पार पाडण्याची तयारी दाखवली आहे. रेवदंडा ग्रामपंचायतीकडे सध्या या बस थांब्याच्या रंगरंगोटी किंवा देखभालीसाठी कोणताही स्वतंत्र निधी उपलब्ध नसल्याचे दिसून येत आहे. मात्र, ग्रामस्थ स्वतःहून पुढाकार घेत असतील तर त्यांना रेवदंडा ग्रामपंचायतीने परवानगी व पाठिंबा द्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
रेवदंडाकरांचा सकारात्मक आदर्श
गावाच्या निसर्गसंपन्नतेकडे दुर्लक्ष करत केवळ आर्थिक आमिषांच्या पाठीमागे धावणार्या तथाकथित विकासाच्या कल्पना गावाच्या मूळ ओळखीवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत, अशी भावना अनेक जण व्यक्त करीत आहेत. ‘आपलं गाव, आपली जबाबदारी’ या भावनेतून उभ्या राहिलेल्या या सामाजिक उपक्रमाने राजकीय दुर्लक्षाच्या पार्श्वभूमीतही एक सकारात्मक आदर्श निर्माण करण्यात आला आहे.
या बस थांब्याबाबत रेवदंडा ग्रामपंचायतीला वर्षापूर्वी निवेदन दिले होते. परंतु, त्या निवेदनला अद्याप उत्तरच मिळालेले नाही. ग्रामपंचायतीकडे जर निधी नसेल तर मी स्वखर्चातून बस थांब्याची रंगरंगोटी करायला तयार आहे.
संदिप खोत,
माजी सदस्य, रेवदंडा ग्रामपंचायत