। अलिबाग । प्रतिनिधी ।
शासनाने प्रशासकीय कामकाजात सुधारणा करण्याबाबत निर्देश दिले आहेत. त्याबाबत परिपत्रक काढण्यात आले आहे. या परिपत्रकाच्या अंमलबजावणीस हिवताप विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना तीव्र विरोध केला आहे. हे परिपत्रक रद्द करण्यात यावे, या मागणीसाठी रायगड जिल्हा हिवताप कर्मचारी कृती समितीच्यावतीने आक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे. बुधवारी (दि.9) दुपारी 1 ते सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेध निदर्शने केली जाणार असल्याची माहिती निमंत्रक संदीप नागे यांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रशासकीय कामकाजात सुधारणा करण्यासाठी 22 नोव्हेंबर 2019 मध्ये परिपत्रक काढण्यात आले आहे. त्याप्रमाणे जिल्हा हिवताप अधिकारी यांना दैनंदिन प्रशासकीय लेखा, भंडार, तांत्रिक विषयक सर्व कामकाज जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या मान्यतेनुसार, करण्याबाबत निर्देश देण्यात आले. या परिपत्रकाविरोधात कर्मचार्यांनी आंदोलन केली. परिपत्रकानुसार कर्मचार्यांवर होणार्या अन्यायाच्या निवारणासाठी तत्कालीन आरोग्यमंत्री यांच्या सोबत चर्चा झाली. त्यानंतर मंत्र्यांनी 2019च्या परिपत्रकाला स्थगिती दिली. मात्र, अचानक या परिपत्रकाप्रमाणे 26 मार्चच्या पत्रानुसार 6 वर्षानंतर अंमलबजावणी करण्याचे आदेश काढण्यात आले. त्यामुळे कर्मचारी संभ्रमात पडले आहेत. कर्मचार्यांमध्ये नाराजीचे सुर उमटत आहेत. बायोमेट्रीक, फेस रिडींग हजेरीमध्ये अनेक अडचणी आहेत. त्यामुळे सुधारणा होईपर्यंत स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.