। अलिबाग । प्रतिनिधी ।
महाडमधील किल्ले रायगड येथे शनिवारी (दि.12) 345 वी शिवपुण्यतिथी व शिवसमाधी जीर्णोद्धार शताब्दी सोहळा होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री, सहकारमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमाची तयारी श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाच्यावतीने सुरु असल्याची माहिती रघुजीराजे आंग्रे यांनी दिली आहे.
लोकमान्य टिळकांनी 1885 मध्ये स्थापन केलेल्या श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ पुणे यांच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांचा 345 वा पुण्यतिथी अभिवादन कार्यक्रम 12 एप्रिल रोजी आयोजित केला आहे. मंडळाच्या पुढाकाराने 1926मध्ये शिवसमाधीचा जीर्णोद्धार केला. त्या सोहळ्याला 100 वर्षे पुर्ण होत आहेत.
यावेळी दुर्ग अभ्यासक निळकंठ रामदास पाटील यांना मंडळातर्फे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते श्री शिवपुण्यस्मृती रायगड पुरस्कार देण्यात येणार आहे. तसेच, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज उदयसिंह होळकर आणि निवृत्त लेफ्टनंट जनरल संजय कुलकर्णी यांना सन्मानित केले जाणार आहे. शुक्रवारी (दि. 11) शिव समाधीला दीपवंदना दिली जाणार आहे. जगदीश्वर प्रांगणात कीर्तन व जागर होणार आहे. राजसभेमध्ये सुरेशराय सुर्यवंशी यांचा ‘ही रात्र शाहिरांची’ हा कार्यक्रम होणार आहे. मंडळातर्फे या रायगडावर तयारी करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेणार्या मावळ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांच्या सेवेसाठी स्वयंसेवकांची नियुक्ती केली आहे. यावर्षी गडावर स्टीलच्या बाटलीद्वारे पाणी देऊन प्लास्टीक मुक्तीचा संदेश देण्याचा प्रयत्न असणार आहे.