। आगरदांडा । प्रतिनिधी ।
मुरुड-जंजिरा नगरपरिषदेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत हा मालमत्ता करवसुली हाच आहे. मालमत्ताकर वसुलीचे निर्धारित उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी करनिर्धारण व संकलन विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी परिश्रम घेत आहेत. मालमत्ता धारकांनी सुद्धा मालमत्ता कर भरण्यासाठी स्वतःहुन पुढे यावे, थकीत मालमत्ता कर भरुन नगरपरिषदेला सहकार्य करावे, असे आवाहन मुरुड -जंजिरा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सचिन बच्छाव यांनी केले आहे. दरम्यान, लेखापाल कपिल वेहेले म्हणाले की, आतापर्यंत 84 टक्के वसुली झाली आहे. आमचा उद्दिष्ट शंभर टक्के वसुली आहे. मुदतीत व परिपूर्ण कर वसूलीमुळे नागरिकांना नागरी सुविधा प्रदान करणे, स्वच्छता राखणे, नगरपरिषदेद्वारे संचलित होणारे दैनंदिन कामे करणे सुकर होते. तरी उर्वरित स्थानिक नागरिकांनी वसुल पथकाला सहकार्य करुन क्युआरकोडच्या मार्फत मालमत्ता कर भरणा करावा. जेणे करुन नगरपरिषदेस नवनवीन योजना संकल्पना राबविण्यास मदत होईल.