| उरण | प्रतिनिधी |
अवघ्या पहिल्याच पावसात दिघोडे-वेश्वी रस्त्यावर अक्षरशः तलाव साचले आहेत. नव्या कोऱ्या रस्त्यांची चाळण होऊन खड्ड्यांनी रस्ते नाहीसे झाले आहेत. कोट्यवधींचा निधी खर्चून बनवलेले हे रस्ते म्हणजे नागरिकांची फसवणूक आहे की सरकारी दरोड्याचं मूर्त रूप आले आहेत.
उरणमध्ये गेल्या काही महिन्यांत दिघोडे, वेश्वी, चिर्ले, उरण मार्ग, ओएनजीसी कॉलनीकडचा मार्ग आदी ठिकाणी रस्त्यांच्या कामांची झडपट सुरूवात झाली. बोर्डांवर ठेकेदाराची नावं, ‘माननीय गडकरी साहेबांच्या पुढाकाराने’ असे मोठे फलक, पण प्रत्यक्षात हा सर्व खेळ “फसव्या विकासाचा” आहे. या रस्त्यांना केवळ सौंदर्यदृष्टिकोनातून वरून थाप दिली गेली. आतून पायाभूत मजबुतीचा पूर्ण अभाव आहे. परिणामी, पावसात पहिल्याच सळसळत्या पाण्यात डांबर विरघळलं, खड्डे उघडे पडले आणि वाहने, नागरिक, शालेय विद्यार्थी अक्षरश: हाल सोसत आहेत.
नागरिकांनी दिघोडे, वेश्वी, उरण ग्रामीण मार्गांबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग, तहसील कार्यालय आणि स्थानिक प्रतिनिधींना वारंवार तक्रारी दिल्या. पण या तक्रारी साचलेल्या फाईलमध्ये गाडल्या गेल्या. कारण यामागे ठेकेदार-प्रशासन-राजकारणी यांचा “तीन चाकी समझौता” आहे, असा आरोप करण्यात येत आहे.
या सर्व रस्त्यांचं आणि पूल कामांचं सार्वजनिक लेखापरीक्षण करावं. काम देताना कोणते निकष लावले गेले? किती रक्कम खर्च झाली? आणि इतक्या लवकर दुरवस्था का झाली? या प्रश्नांची उत्तरं मिळाली पाहिजेत. अन्यथा, उरणवासियांचा रोष थेट तुमच्याकडेच वळणार आहे.