उपद्रवी लोकांकडून विद्रुपीकरण
| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
सुधागड तालुक्यात प्राचीन व बहुमूल्य लेण्यांचे समूह आढळतात. तसेच, या लेण्या देशविदेशातील अभ्यासक व पर्यटकांचे आकर्षण ठरत आहेत. मात्र, जगभरातील पर्यटकांना भावणाऱ्या या लेण्या जतन करण्याची गरज निर्माण झाली आहे. या प्राचिन लेण्यांकडे प्रशासन व पुरातत्व विभागाचे फारसे लक्ष नसल्याने त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. या वास्तू नामशेष होण्याची भिती असल्यामुळे त्यांचे जतन व संगोपन करण्याची गरज निर्माण झाली आहे.
निसर्गाच्या कुशीत वसलेल्या सुधागड तालुक्यातील या प्राचीन बौद्ध कालीन लेण्या देशविदेशातील अभ्यासक व पर्यटकांचे आकर्षण ठरत आहेत. येथे ठाणाळे, नेणवली, गोमाशी व चांभार अशा भव्य लेणींचा समूह आहे. मागील वर्षी या लेण्यांमध्ये अमेरिकेतील भन्ते वेन सुका ध्यानधारणेसाठी आल्या होत्या. तर, अनेक देशविदेशातील अभ्यासक दौरे देखील करत असतात. येथील स्तुप, विहार, चैत्यगृह, शिलालेख स्मारक यांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली असुन त्यावर अनेक उपद्रवी लोकांकडून रंग रंगोटी व विद्रुपीकरण करण्यात येत असल्याने लेणी प्रेमी व पर्यटकांतून नाराजी व्यक्त करण्यात येते. इतिहासाची भरभक्कम साक्ष देणाऱ्या या वास्तु नामषेश होण्याची भिती निर्माण झाली आहे. त्यामुळे त्यांचे जतन व संगोपन होण्याची अतिशय आवश्यकता आहे, असे बोलले जात आहे. तसेच, ठाणाळे लेण्यांसारखा ऐतिहासिक व पुरातन ठेवा जतन करण्यासाठी प्रशासनाकडून विशेष व प्रभावी उपाययोजना राबविण्यात यावी, अशी मागणी पर्यटकप्रेमी व लेणीप्रेमी यांनी केली आहे.

ठाणाळे लेणी
ठाणाळे लेणी समुहात चैत्यगृह, स्मारक, स्तुपसमुह, सभागृह व उर्वरित 21 विहार लेणी आहे. बहुतांश विहारांमध्ये व्हरांडे आणि एक किंवा दोन खोल्या असून त्यामध्ये शयनासाठी ओटे आहेत. काही विहारांमध्ये समोरच्या भागात दालन व चार पाच भिक्षुंच्या निवासाची व्यवस्था आहे. अशा विहारात आंतरदालन, प्रवेशद्वार, खिडकी व शयन ओटे आहेत. 5 पायऱ्या असलेल्या एका विहारात वाकाटककालिन रंगीत चित्रांचे काही अवशेष दिसतात. प्राकृत ब्राम्ही लिपीतील शिलालेख असलेले एक पाण्याचे टाके आहे. पाण्याचे हौद, टाके, ब्राम्ही शिलालेख भित्तीचित्र आहेत. या सर्वांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. बरेच अवशेष भग्नावस्थेत आहेत. अनेक उपद्रवी लोकांनी येथील स्तुप, चैत्यगृह, स्मारक यावर चुन्याने व ऑईल पेन्टने आपली नावे कोरली आहेत. त्यामुळे या एैतिहासिक वास्तुचे सौंदर्य लुप्त झाले आहे.





