सुतारवाडी पूल मोजतोय अखेरची घटका

। सुतारवाडी । प्रतिनिधी ।

गेल्या 70 वर्षांची साक्ष देणारा सुतारवाडी येथील सुमारे 40 मीटर लांबीचा छोटा पूल आता अखेरची घटका मोजताना दिसत आहे. या पुलावरून अनेक लहान-मोठी वाहने तसेच अवजड वाहने रात्रंदिवस ये-जा करत असतात. पंधरा दिवसांपूर्वी या पुलाचे संरक्षक कठडे तोडून ट्रेलर पुलाखाली पलटी झाला होता. त्या एका बाजूचे संरक्षक कठडे पुलाखाली पडलेल्या अवस्थेत आहेत.

या पुलाखालून पाणी वाहात असल्यामुळे त्या ठिकाणी गणपती विसर्जनासाठी उत्तम प्रकारे व्यवस्था केलेली आहे. या ठिकाणी पाच दिवसाचे आणि दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन केले जाते. येथील पुलाची गॅरंटी जवळ जवळ संपत आल्याचे दिसत आहे. या पुलाला दोन्ही बाजूंनी भेगा पडल्या आहेत. या पुलाची वेळीच दखल घेतली नाही तर रहदारीचा मार्ग बंद होईल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

सुतारवाडी परिसरामध्ये अनेक फार्म हाऊस असल्यामुळे वर्षभर पर्यटकांची गर्दी असते. हे पर्यटक मोठ मोठ्या लक्झरी बसेसमधून येत असतात. याच पुलावरून त्यांची ये-जा सुरू असते. त्याचप्रमाणे सुतारवाडी येथून विले भागाड या ठिकाणी अनेक कंपन्या असल्यामुळे कंपन्यांमध्ये कच्चा माल आणण्यासाठी त्याचप्रमाणे तयार झालेले सामान बाहेर नेण्यासाठी अवजड वाहनांचा उपयोग केला जातो. त्यामुळे रात्रंदिवस या ठिकाणावरून सर्रासपणे ही वाहने धावत असतात. दरम्यान, या पुलाची आता बिकट अवस्था झाली असून, या ठिकाणी सुसज्ज पूल होणे काळाची गरज आहे.

Exit mobile version