| उरण | वार्ताहर |
चाणजे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील करंजा जेटीवरील सार्वजनिक शौचालयाची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक, पर्यटकांची विशेष करून महिलांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. तरी चाणजे ग्रुप ग्रामपंचायत व महाराष्ट्र मेरी टाईम बोर्ड विभागाच्या अधिकार्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
चाणजे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीत कोळी बांधवांची दहा ते बारा हजारांच्या आसपास लोकवस्ती आहे. कोळी बांधव आपला पारंपरिक मासेमारीचा व्यवसाय तसेच मासेमारीसाठी जाणार्या बोटी करंजा जेटीवर नांगरुन ठेवण्याचे काम करत आहेत. तसेच अलिबाग ते उरण या ठिकाणाहून ये-जा करणारे प्रवासी नागरिक व पर्यटक हे करंजा बंदरातील जेटीचा वापरही मोठ्या प्रमाणात करत आहेत. कोळी बांधव व प्रवासी नागरिक, पर्यटकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन महाराष्ट्र मेरी टाईम बोर्ड व रायगड जिल्हा परिषद, चाणजे ग्रुप ग्रामपंचायत यांनी आठ-दहा वर्षांपूर्वी याठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृह, शौचालयाची बांधण्याचे काम हाती घेतले होते. परंतु, स्वच्छतागृह बांधल्यानंतर या ठिकाणी कुठलीही देखभाल दुरुस्ती न केल्यामुळे या स्वच्छतागृहाची, शौचालयाची दुरवस्था झालेली आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना स्वच्छ आणि नादुरुस्त असलेल्या स्वच्छतागृहामध्ये नाईलाजाने जाऊन त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच मागील वर्षांपूर्वी करंजा बंदरातील स्वच्छतागृह शौचालय पडून नागरिक दगावल्याची घटना घडली होती. तरी चाणजे ग्रुप ग्रामपंचायत, महाराष्ट्र मेरी टाईम बोर्ड व रायगड जिल्हा परिषद यांनी सदर स्वच्छतागृह, शौचालयाच्या देखभाल दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अशी मागणी प्रवासी, पर्यटक नागरिकांकडून केली जात आहे.