कशेडीचा दुसरा बोगदा खुला होण्याची शक्यता धूसर

गणेशभक्तांचा होणार हिरमोड

| खोपोली | प्रतिनिधी |

मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटाला पर्याय असणारा घाटातील दुसरा बोगदा 3 सप्टेंबरपूर्वी वाहतुकीस खुला करून चाकरमानी दोन्ही बोगद्यांतून मार्गस्थ होतील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कशेडी बोगद्याच्या पाहणीदरम्यान जाहीर केले होते. मात्र, प्रत्यक्षात दुसर्‍या बोगद्याचे काम धीम्या गतीने सुरू आहे. त्यामुळे गणेशोत्सवात दुसरा बोगदा वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता धूसर बनली आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या पळस्पे फाट्यापासून कशेडी घाटापर्यंतच्या रखडलेल्या कामांसह खड्ड्यांत गेलेल्या मार्गामुळे गणेशभक्तांना यंदाही जीवघेणाच प्रवास करावा लागणार होता.

महामार्गाचे काम अर्धवट स्थितीत सोडून पळ काढणार्‍या ठेकाधारक कंपनीवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्यात आले, तर 3 सप्टेंबरपूर्वी महामार्ग सुस्थितीत आणण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार माणगाव पोलीस ठाण्यात ठेकाधारक पंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राष्ट्रीय महामार्ग खात्याने गणेशोत्सवापूर्वी महामार्गावरील खड्डे बुजवत गणेशभक्तांचा प्रवास सुखकर करण्यासाठी कंबर कसली आहे. खड्डे बुजवण्यासाठी चार अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे निर्देशदेखील देण्यात आले आहेत. त्यानुसार युद्धपातळीवर खड्डे बुजवून मार्ग सुस्थितीत आणण्याचे काम सुरू आहे. चाकरमान्यांसाठी ही समाधानकारक बाब असली तरी बुजवलेले खड्डे कितपत तग धरतील, हादेखील प्रश्‍नच आहे.

Exit mobile version