निःशब्द! डॉक्टर, मुलगी कुठेय

डॉक्टरांच्या हलगर्जीपणाने शवविच्छेदन रखडले;
आदिवासी मुलीच्या मृतदेहाची अवेहलना

। अलिबाग । प्रमोद जाधव ।

अलिबाग जिल्हा रुग्णालयातील मृतदेहाबाबत आरोग्य विभागाचा भयानक हलगर्जीपणा समोर आला आहे. गेली 24 तास जिल्हा रुग्णालयात बाप आपल्या चिमुकलीचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी तडफडत आहे. मुलीचा मृतदेह कधी ताब्यात देतील, याकडे बापाचे लक्ष लागून राहिले असून प्रत्येकाला डॉक्टर, मुलगी कुठेय अशी आर्त हाक देत आहे.

मुलीच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे बापाच्या पायाखालची वाळूच सरकली. असे असताना गेले 24 तास पोटात अन्नाचा कण नाही, त्यात अन्न समोर असतानाही भुक नाही. अशी परिस्थिती निर्माण झाली असताना, बापाचे हे प्रेम जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांना कधी कळणार, असा संतापजनक प्रश्‍न उपस्थित होत आहे. घरात चहा करीत असताना अचानक मुलगी खाली पडली. क्षणाचाही विलंब न करता तिला नागोठण्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. डॉक्टरांनी मुलीला मृत घोषित केले. काहीच समजत नव्हते. डॉक्टरांच्या सल्ल्यानूसार जिल्हा रुग्णालयात आणले. मात्र 24 तास उलटून गेले, तरी मुलीला ताब्यात दिले नाही, हे सांगताना त्या बापाचा कंठ दाटून आला. जिल्हा रुग्णालयाबाहेर त्या बापाने फोडलेला हंबरडा प्रत्येकाच्याच मनाला चटका लावणारा होता.

वैशाली प्रकाश पवार (वय 13) असे या मुलीचे नाव आहे. ही मुलगी खांब येथील हायस्कूलमध्ये इयत्ता सातवीच्या वर्गात शिक्षण घेत होती. बुधवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घरात असताना ती चहा तयार करीत होती. परंतू अचानक ती खाली पडून बेशुध्द झाली. त्याच अवस्थेत तिला नागोठणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तपासून ती मृत असल्याचे घोषित केले. मात्र तिच्या मृत्यूचे नक्की कारण स्पष्ट न झाल्याने तिच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करणे आवश्यक होते.

डोंगरदर्‍यात राहणार्‍या आदिवासी समाजाच्या अल्पवयीन मुलीच्या मृतदेहाची अवेहलना 24 तास होत आली तरी सुरुच होती. शवविच्छेदन डॉक्टरांच्या हलगर्जीपणाने रखडल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने यांना मिळताच त्यांनी संबंधित डॉक्टरांना बोलावून तातडीने शवविच्छेदन करण्याचे आदेश दिले. त्यानंतर काही प्रमाणात सुत्रे हालली. मात्र चार वाजले तरीही शवविच्छेदन झाले नसल्याची माहिती समोर आली आहे.

18 तास डॉक्टरांची चर्चाच
प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकिय अधिकार्‍यांनी शवविच्छेदनाचा अधिकार नसल्याचे सांगून मृतदेह पुढील दवाखान्यात हालविण्यास सांगितले. मृत मुलीला घेऊन बाप व त्यांचे नातेवाईक संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. मृत मुलीचे शवविच्छेदन करण्यासाठी रुग्णालयातील डॉ. गवई व डॉक्टर मोनिका सिंग यांची चर्चा झाली. परंतू ही चर्चा संध्याकाळी साडेसहा वाजल्यापासून दुसर्‍या दिवशी दुपारी दोन वाजेपर्यंत सुरुच होती.

बापाचे डोळे मुलीकडे
विटभट्टीत काम करून मुलीला शिक्षण देण्यासाठी बाप धडपडत होता. बुधवारी सकाळी अचानक झालेल्या या घटनेनंतर बाप निःशब्द झाला. जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी आणलेल्या मुलीला परत अंत्यसंस्कार करण्याकरिता नेण्यासाठी 24 तासांपासून जिल्हा रुग्णालयात येरझार्‍या घालत आहे.  

आदिवासी अल्पवयीन मुलीचे शवविच्छेदन करण्याबाबत संबंधित डॉक्टरांनी अन्य तज्ज्ञांचे मत घेण्यास विलंब लावला. त्यामुळे शवविच्छेदन करण्यास विलंब झाला. ठोस भुमिका घेऊन मुलीचे शवविच्छेदन तातडीने करण्याच्या सुचना संबंधित डॉक्टरांना व तज्ज्ञांना दिल्या आहेत.

 डॉ. सुहास माने, जिल्हा शल्यचिकित्सक, अलिबाग
Exit mobile version