शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांचे आवाहन
। अलिबाग । प्रतिनिधी ।
देशात, राज्यात सध्या घाणेरडे राजकारण सुरु आहे. भाजप सरकार आपल्या ताकदीच्या जोरावर धर्मा-धर्मात, जाती-जातीमध्ये वाद निर्माण करीत आहे. परिवारामध्ये फूट पाडत आहेत. हक्क, अधिकार बळकावण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. तुमचे हक्क, अधिकार अबाधित राखण्यासाठी संविधान, लोकशाही टिकली पाहिजे. देश वाचवणे तुमच्या हातात आहे, येत्या सात मे रोजी इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांना मशाल चिन्हावर भरघोस मतदान करुन विजयी करा, तटकरेंना पाडण्याची ताकद तुमच्या हातात आहे, असा विश्वास शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी जनतेला दिला.
इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारार्थ मुरूडमध्ये शुक्रवारी (दि.3) प्रचार सभा आयोजित करण्यात आली. यावेळी ठाकरे बोलत होते. यावेळी काँग्रेसचे नेते भाई जगताप, शेकापचे माजी आ. पंडित पाटील, आ. संजय पोतनीस, उमेदवार अनंत गीते, शेकाप जिल्हा चिटणीस अॅड. आस्वाद पाटील, शेकाप महिला आघाडीप्रमुख चित्रलेखा पाटील, मराठी मुस्लीम समाजाचे अध्यक्ष सुभान अली, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे, विजय गिदी, नीता गिदी, वामन चुनेकर, तुकाराम पाटील, चंद्रकांत कमाने, प्रशांत मिसाळ, हेमंत पाटील, शंकर गुरव, दर्शना पाटील, नाना गुरव, पिंट्या ठाकूर, अस्लम हलदे, नवशाद शाबान, नवशाद दळवी, शरद चवरकर, प्रमोद भायदे, आदेश दांडेकर, अल्पा घुमकर, किशोर जैन, सुभाष महाडिक आदी मान्यवरांसह शेकापसह इंडिया आघाडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी मतदारांसह कार्यकर्त्यांना संबोधित करताना आदित्य ठाकरे म्हणाले की, देशात असुरक्षिततेचे वातावरण आहे. महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर आहे, युवकांना रोजगार नाहीत, शेतीमालाला हमीभाव नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रातील अनेक उद्योग गुजरातला जात आहेत. तरुणांच्या घशातला घास काढण्याचा घाट या भाजपने सुरु केला आहे. त्याची सुरुवात झाली आहे. दहा वर्षांत गॅस, डिझेल व पेट्रोलच्या भावामध्ये तिप्पट वाढ केली आहे. सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले आहे. आरक्षण अधिकार, संपवण्याचा प्रयत्न सुरु आहे.
प्रत्येक गोष्ट गुजरातला घेऊन जात आहेत. जर का यांचे सरकार आले, तर मुंबईतील मंत्रालयदेखील गुजरातला घेऊन जातील. त्यामुळे प्रत्येकाने सावध भूमिका घेत लोकशाहीच्या हितासाठी इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांना मतदान करून निवडून द्या, असे आवाहनही आदित्य ठाकरे यांनी केले. आपल्या देशाचे संविधान वाचवण्यासाठी मोठ्या प्रमाणात मतदान करून भाजप राजवट नाहीशी करूया, असा निश्चय यावेळी त्यांनी व्यक्त केला. एक ठाकरे सोबतीला घेऊनसुद्धा भाजपला देशाची सत्ता घेता येणार नाही. कारण, जनतेच्या मनात तीव्र असंतोष आहे. आता त्यांना जागा दाखवल्याशिवाय जनता स्वस्थ बसणार नाही. शेतकर्यांची आंदोलने चिरडली जातात. नोटबंदी करून अनेकांना देशोधडीला लावले. त्यामुळे सत्तेत आल्यावर पुन्हा भाजप नोटबंदी आणणार आहे. यासाठी जनतेने सावध राहावे, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला.
ही लढाई अस्तित्वाची- अनंत गीते रायगड लोकसभेची निवडणूक तुमच्या-आमच्या अस्तित्वाची असणार आहे. ही लढाई भ्रष्टाचाराविरुद्ध सदाचार अशी असून, गद्दारांविरोधात आहे. देशामध्ये चोर पावलांनी हुकूमशाही येण्याची शक्यता आहे. त्यामुळे रायगडची जनता सुजाण आहे. येत्या सात मे रोजी मशाल चिन्हावर मतदान करून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून द्या, असे आवाहन इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांनी केले.
प्रलोभनांना भुलू नका- पंडित पाटील देशात गलिच्छ राजकारण सुरु आहे. देशातील, लोकशाही संविधान धोक्यात येऊ लागले आहे. रायगड लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते आहेत. या निवडणुकीत मुस्लिम समाज हाच विजयाचा गाभा राहणार आहे. संविधान वाचवण्यासाठी सर्व पक्ष एकत्र आले आहेत. मतदारांनी कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नका असे आवाहन करीत पंडित पाटील पुढे म्हणाले, अनंत गीते यांच्यासारखा सच्चा उमेदवार इंडिया आघाडीला मिळाला आहे. गीते यांच्यावर एकसुद्धा भ्रष्टचाराचा आरोप नाही, ते निष्कलंक असून, मोठ्या मताधिक्क्याने त्यांना निवडून द्या, असे आवाहन यावेळी त्यांनी केले.
अब की बार भाजप तडिपार- जगताप गोरगरीब, शेतकरी, कष्टकरी, दीन दुबळ्यांना केंद्रबिंदू मानून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रचंड मेहनत घेत भारताची घटना तयार केली. समानता, न्यायावर आधारित असलेल्या या संविधानाला नष्ट करण्याचा प्रयत्न सुरु आहे. ही निवडणूक म्हणजे एक युद्ध आहे. कारण, या निवडणुकीत भाजपसारखा राक्षस डोक्यावर बसला, तर राज्यघटना पायदळी तुडवण्याची भीती आहे. त्यामुळे ‘अब की बार, भाजप तडिपार’ ही भूमिका घेत अनंत गीते यांना बहुमांनी निवडून द्या, असे आवाहन काँग्रेसचे नेते भाई जगताप यांनी केले.