मासेमारी बंदीमुळे आवक घटली
। उरण । वार्ताहर ।
1 जुनपासुन 31 जुलैपर्यंत शासनाच्या खोल समुद्रातील पावसाळी 61 दिवसांच्या मासेमारी बंदीच्या आदेशानंतर मासळीची आवक घटली आहे. यामुळे मासळीचे भाव चांगलेच कडाडले आहेत.
पश्चिम तटवर्ती समुद्री क्षेत्रातील मासेमारी बंदीचे आदेश जारी केले आहेत. यामुळे हजारो मच्छीमार बोटींनी करंजा, मोरा, रेवस, मुळेखंड, खोपटा, वशेणी, गव्हाण आदि विविध खाडीतील बंदरात नांगर टाकून विसावल्या आहेत. पावसाळी मासेमारी बंदी दरम्यान दररोज बाजारात येणार्या विविध प्रकारच्या मासळीची आवक पुरती घटली आहे. त्यामुळे बाजारात मासळीचा तुटवडा जाणवत आहे.
पापलेट, घोळ, जिताडा, माकूळ, कलेट, सुरमई, रावस, हलवा आदी चांगल्या प्रतीची मासळी पावसाळी मासेमारी बंदीनंतर बाजारात दिसेनाशी झाली आहे. आणि मिळालीच तर या मासळीचे भाव सामान्यांच्या आवाक्याबाहेरचे आहेत. त्यामुळे स्थानिक मच्छीमारांकडून डोल, वावरी, खांदा, फग, वाणे आदी प्रकारातून पकडून बाजारात येणार्या बोंबील, मांदेली, चिवणी, वाकटी, बांगडे, निवट्या, कालवं, भिलजी, वाम आदी दुय्यम प्रकारच्या मासळीवर खवय्यांना समाधान मानावे लागत आहे. मासळीच्या तुटवड्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही मासळीचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे मासळी खवय्यांची चांगलीच पंचाईत झाली आहे. पावसाळी मासेमारी बंदीची मुदत संपुष्टात येईपर्यंत आणि मासळीची आवक वाढीपर्यत मासळीचे भाव सामान्यांच्या आवाक्यात येणं अवघडच असल्याच्या प्रतिक्रिया मासळी व्यावसायिकांकडून व्यक्त केल्या जात आहेत.
मासळी | बंदी आधीचे दर | बंदी नंतरचे दर |
पापलेट (किलो) | 800 ते 1000 | 1000 ते 1500 |
सुरमई (किलो) | 700 ते 800 | 800 ते 1000 |
कोळंबी (किलो) | 450 ते 550 | 700 ते 800 |
रिबनफिश (नग) | 75 ते 80 | 150 ते 200 |
हलवा (किलो) | 400 | 550 ते 650 |
माकुळ (नग) | 500 ते 700 | 800च्या पुढे |
रावस (किलो) | 600 ते 800 | 800 ते 1000 |
जिताडा (किलो) | 1000 | 1200 |
बांगडा (3 नग) | 100 ते 150 | 200 |