पंतप्रधानांना फक्त उद्योगपती दिसतात- माकप नेत्या वृंदा करात

| अकोले | प्रतिनिधी |

पंतप्रधान मोदी डोळ्यावर चष्मा लावून जेव्हा पाहतात तेव्हा चष्म्यातून त्यांना सामान्य माणूस दिसत नाही. त्यांना अदानी, अंबानी, मोठे उद्योगपती आणि अमेरिका दिसते. त्यांना मजुरांचे, शेतकऱ्यांचे हक्क दिसत नाहीत, देशातील विधवांचे दुःख आणि त्यांचा संघर्ष दिसत नाही. ग्रामसभेचे अधिकारी काढून घेतले जात आहेत, जल, जंगल, जमिनीवर आदिवासींचे हक्क दिसत नाहीत, अशी टीका मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या वृंदा करात यांनी केली.

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभा, सीटू, जनवादी महिला संघटना आणि ‌‘डीवायएफआय‌’ यांच्या नेतृत्वाखाली अकोले येथे महामुक्काम सत्याग्रह सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आयोजित सभेत त्या बोलत होत्या. लाल बावटा घेऊन सभेला आलेल्या महिलांचा संदर्भ देत वृंदा करात म्हणाल्या, या महिला राज्य सरकारला सांगत आहेत की, “आम्ही तुमच्या लाडक्या बहिणी नाहीत, तर आम्ही लढावू बहिणी आहोत” आणि आमच्या एकीच्या बळावर आम्ही आमच्या मागण्या पदरात पाडून घेऊ. देशातील शेतकरी, कामगार, महिला, दलीत, आदिवासी, अल्पसंख्याक हे भाजप-आरएसएस सरकारच्या राजवटीत भरडले जात आहेत. हे सरकार हिंदू-मुसलमान करीत समाजात फूट पडण्याचे काम करीत आहे. मात्र, बहिणींचे हक्क आणि शेतकऱ्यांच्या जमिनी काढून घेताना हिंदू आहे की मुसलमान आहेत हे पहात नाहीत, अशी टीका करीत धर्मजातीचे राजकारण करण्याच्या सरकारच्या धोरणावर वृंदा करात यांनी टीकास्त्र सोडले. तसेच, इंग्रजांपुढे गुडघे टेकवत ज्यांनी माफी मागितली ते आज आम्हाला देशभक्ती शिकवत आहेत, असा टोला देखील त्यांनी लगावला. देशात 13 कोटी मतदारांची चोरी करीत लोकशाही व्यवस्थेवर हल्ला करण्यात आला आहे. ज्यांची नावे मतदार यादीतून वगळली गेली त्यात सर्वाधिक संख्या महिलांची आणि स्थलांतरित मजुरांची आहे. मागील पाच वर्षांत 11.5 लाख वनजमिनीचे दावे दाखल झाले आहेत. त्यातील निम्म्यापेक्षा अधिक तसेच पडून आहेत. जे मंजूर झाले त्यातही मागितल्यापेक्षा फारच कमी जमीन आदिवासींना दिली गेल्याचे त्यांनी सांगितले.

Exit mobile version